महापर्वणीला ‘भोलेनाथ’चा गजरत्
By Admin | Updated: September 13, 2015 22:10 IST2015-09-13T22:09:44+5:302015-09-13T22:10:47+5:30
र्यंबक : आठ तास मिरवणूक

महापर्वणीला ‘भोलेनाथ’चा गजरत्
त्र्यंबकेश्वर : अंगणी सडा रांगोळ्यांची सजावट, आकाशातून पडणारी सुगंधित पुष्पवृष्टी, हर हर महादेवचा होणाऱ्या जयजयकारात रविवारी त्र्यंबकेश्वर येथे दहाही आखाड्यांच्या हजारो साधू-महंतांची लाखो भाविकांच्या उपस्थितीत महापर्वणीची शाही मिरवणूक निघाली.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या परंपरागत मार्गावरून शाही मिरवणुकीला पहाटे तीन वाजता प्रारंभ करण्यात आला. दुसऱ्या पर्वणीच्या निमित्ताने आखाड्यांच्या शाहीस्रान क्रमात बदल केल्यामुळे पंचायती श्री निरंजनी व श्री आनंद आखाड्याला मिरवणुकीत व शाहीस्रानाला पहिला मान देण्यात आला. मूळ आखाड्यापासून वाजत गाजत निघालेली मिरवणूक नील पर्वताच्या पायथ्याशी येताच पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या वतीने महंत श्री हरिगीरीजी महाराज यांचा सत्कार करण्यात आला व ‘बम बम भोले’ असा आसमंत दणाणून सोडणारा जयघोष होताच, मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. अग्रभागी ढोल-ताशांचा गजर व त्याच्या ठेक्यावर अंगाला भस्म फासलेले नागा साधूंचे नृत्य, पाठोपाठ चांदीच्या पालखीत विराजमान झालेली आखाड्यांची इष्टदेवता अशा शाही थाटात निघालेल्या या मिरवणुकीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. तत्पूर्वी रात्री पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शाही मिरवणूक मार्गावर राहणाऱ्या त्र्यंबकवासीयांनी दारापुढे सडा टाकून आकर्षक रांगोळीने मार्ग सजविला होता. ही मिरवणूक मार्गस्थ होण्यास साधारणत: अर्धातासाचा कालावधी लागला. तोपर्यंत निल पर्वताला लागून असलेल्या श्री जुना, श्री पंच दशनाम आवाहन व श्री अग्नी आखाड्यांच्या साधूंनी मिरवणुकीची तयारी सुरू केली. नागा साधूंनी हातात तलवारी, दांडपट्टा, भाले, परशू घेऊन त्याच्या करामती तसेच शारीरिक कसरती सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पहाटे तीन वाजून ५० मिनिटांनी अगोदर श्री जुना आखाड्याची धर्मध्वजा व इष्टदेवतेला प्राधान्य देण्यात आले. त्यापाठोपाठ दोन्ही आखाड्यांचे प्रमुखमहंतांनी एकत्र येत धर्मध्वजाचे पूजन केले. तीनही आखाड्यांची एकत्रित मिरवणूक निघाल्याने सर्वांत मोठी ही मिरवणूक होती. साधारणत: तासभर ती चालली, परिणामी अखेर बऱ्याचशा महामंडालेश्वरांनी सजविलेल्या वाहनातून खाली उतरत पायीच जाणे पसंद केले. सव्वापाच वाजता पंचायती महानिर्वाणी आखाड्याचे शाही मिरवणूक मार्गावर आगमन झाले. त्यानंतर साधारणत: दोन तासांच्या विलंबाने म्हणजे पावणे आठ वाजता बडा उदासीन आखाड्याची मिरवणूक कुशावर्त कुंडाच्या पाठीमागील मार्गाने आगमन झाले. गतवेळ प्रमाणे रविवारच्या पर्वणीतही या कुशावर्ताच्या तोंडाशी भाविकांची प्रचंड चेंगराचेंगरी झाली. त्यावेळी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. नऊ वाजता नया उदासीन व त्यानंतर दहा वाजेच्या सुमारास निर्मल पंचायतीने ‘बोले सो निहाल, सत् श्री अकाल’ म्हणत कुशावर्ताचा रस्ता धरला.
रंगीबेरंगी फुलमाळांनी सजविलेली वाहने, त्यावर चांदीच्या पालखीत विराजमान झालेल्या अखाड्यांच्या श्री इष्टदेवता व ढोल-ताशांच्या गजरात धर्मध्वजा अग्रभागी डोलाने मिरवत रविवारी पहाटे तीन वाजता सुरू झालेली शाही मिरवणूक सूर्य डोक्यावर हळूहळू चढत असताना सकाळी १० वाजता संपुष्टात आली.