आखाड्यांना लागले आता ध्वजारोेहणाचे वेध
By Admin | Updated: August 9, 2015 00:15 IST2015-08-09T00:13:55+5:302015-08-09T00:15:15+5:30
आखाड्यांना लागले आता ध्वजारोेहणाचे वेध

आखाड्यांना लागले आता ध्वजारोेहणाचे वेध
त्र्यंबकेश्वर : गुरुपौर्णिमा आटोपल्यानंतर विविध आखाडे व संस्थांचे साधू-महंत उज्जैन, हरिद्वार, अलाहाबाद आदि ठिकाणांहून कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वरकडे निघाले आहेत. सर्व आखाड्यांना आता ध्वजारोहण व पेशवाईचे वेध लागले असून, एरवी शुकशुकाट असलेले येथील आखाडे आता लग्नघरासारखे गजबजू लागले आहेत. प्रत्येक आखाड्यामध्ये एकीकडे विकासकामांवर शेवटचा हात देण्याची लगबग सुरू असताना दुसरीकडे किराणा, गॅस सिलिंडरची व्यवस्था करणे, अन्नछत्रांसाठी मंडप टाकणे अशी गडबड दिसून येत आहे. नगर परिषदेने सर्व आखाड्यांना ध्वजारोहणासाठी बल्ली (निलगिरीचे मजबूत लाकूड) दिले असून, ध्वजस्तंभही सज्ज झाले आहेत. आखाड्यांमध्ये साधू-महंतांची वर्दळ वाढल्याने दूध, भाजीपाला, फळे, फुले, सिलिंडर, किराणा सामान आदिंचीही मागणी वाढली आहे. काही आखाड्यांमध्ये छोट्या भंडाऱ्यांनीही सुरुवात झाली आहे.