तिसऱ्या पर्वणीसाठी आखाडे, प्रशासन सज्ज
By Admin | Updated: September 23, 2015 23:07 IST2015-09-23T23:07:16+5:302015-09-23T23:07:53+5:30
विक्रमी गर्दी होण्याची शक्यता : पहिल्या पर्वणीप्रमाणे असणार क्रम

तिसऱ्या पर्वणीसाठी आखाडे, प्रशासन सज्ज
त्र्यंबकेश्वर : कुंभमेळ्यातील पहिली अन् दुसरी पर्वणी उत्साहात आणि शांततेत पार पडल्यानंतर आता आखाडे, प्रशासन आणि भाविकांना तिसऱ्या पर्वणीचे वेध लागले आहेत. आखाडे व प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, पहिल्या पर्वणीतील क्रमानुसारच शाहीस्नान विधिवत, सवाद्य मिरवणुकीने पार पडणार आहे.
जुना आखाडा पहाटे ३.४० मिनिटांनी पिंपळद येथील आखाड्यातून निघणार असून, जव्हारफाटा-खंडेराव मंदिर-तेलीगल्ली या मार्गे ४.१५ पर्यंत कुशावर्तावर आखाड्याची आद्यदेवता दत्त भगवान आणि निषाण, शस्त्र, भाले यांचे
पूजन, स्नान झाल्यानंतर आखाड्यातील नागा साधू, साधू-महंत व भाविक स्नान करून ५ वाजता शाही मार्गाने त्र्यंबकेश्वर मंदिरात जातील. तेथील दर्शन आटोपून वाजतगाजत ही मंडळी पहाटे ६ वाजेपर्यंत आपल्या आखाड्यात परतणार आहेत. याच आखाड्याबरोबर खंडेराव महाराज मंदिर येथे आवाहन आणि अग्नी आखाडा येणार असून, त्यांचेही स्नान ठरलेल्या वेळांनुसार होईल.
अग्नी आखाडा ६.१५ पर्यंत आपल्या आखाड्यात परतेल. त्यानंतर ४.२० ते १२ वाजेपर्यंत निरंजनी आखाडा, आनंद आखाडा, महानिर्वाणी, अटल, बडा उदासीन, नवा उदासीन व निर्मल हे आखाडे सवाद्य मिरवणुकीसह कुशावर्तावर येतील व स्नान करून शाही मार्गाने त्र्यंबकराजाचे दर्शन करून आपापल्या आखाड्यांत परत जातील.
साधू-संत-महंत व त्यांचे भाविक यांना शांततेने व विधिवत स्नान करताना कोणताही अडथळा येणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. आखाडे, ग्रामस्थ आणि भाविकांच्या मागणीनुसार कुशावर्त चौक ते त्र्यंबकेश्वर मंदिर या शाही मार्गावर मध्यभागी बॅरिकेड्समध्ये भाविकांना थांबू दिले जाणार असून, ग्रामस्थ व देशभरातून आलेल्या भाविकांना कुंभमेळ्यातील शाहीस्नानांचा, मिरवणुकांचा आस्वाद घेऊ दिला जाणार आहे.
दुपारी १२ वाजेनंतरच भाविकांना कुशावर्त तीर्थ खुले करून देण्यात येणार असून, तोपर्यंत कुणीही स्नानाला जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तिसऱ्या पर्वणीसाठी चार लाख भाविक येण्याचा अंदाज गृहीत धरून त्यानुसार परिवहन महामंडळ, नगरपरिषद, पोलीस प्रशासन, विद्युत महामंडळ आदिंनी नियोजन आराखडा तयार केला आहे.
पहिल्या पर्वणीतील भाविकांचा अल्प प्रतिसाद व इतर प्रशासकीय त्रुटी दूर करीत यशस्वी झालेल्या दुसऱ्या पर्वणीप्रमाणेच तिसरी पर्वणीही सर्वाधिक यशस्वी पार पाडण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी सर्व पातळीवर सज्जता झाली आहे.
या पर्वणीतही पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात येणार असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाबरोबरच स्थानिक कार्यकर्ते, जीवरक्षक दल, आरोग्य यंत्रणा, नगरपरिषद टीम, पुरोहित संघ आणि ग्रामस्थ परिश्रम घेणार आहेत. (वार्ताहर)