सिंहस्थात आखाडे, खालशांना पाचशे शिधापत्रिका
By Admin | Updated: August 26, 2015 23:42 IST2015-08-26T23:41:34+5:302015-08-26T23:42:39+5:30
घासलेट उपलब्ध : गहू, तांदळाला प्रतिसाद

सिंहस्थात आखाडे, खालशांना पाचशे शिधापत्रिका
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राममध्ये आलेल्या साधू-महंतांना रास्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे पाचशेहून अधिक शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले असून, प्रत्येक शिधापत्रिकेवर सरासरी तीन ते पाच हजार व्यक्तींची संख्या टाकण्यात आल्याने त्यांच्याकडून रेशनच्या धान्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. चालू महिन्यात नाशिक जिल्ह्यासाठी बारा हजार लिटर घासलेट अतिरिक्त उपलब्ध झाल्याने हे घासलेटही ‘मागणीनुसार पुरवठा’ करण्यात येणार आहे.
प्रशासनाकडून तपोवनातील साधुग्राममध्ये पाच तात्पुरती रेशन दुकाने सुरू करण्यात आली आहेत. त्याद्वारे तांदूळ, गहू व साखर उपलब्ध करून देण्यात आली असून, आखाडे, खालशांमधील साधू-महंतांना त्यासाठी तात्पुरती शिधापत्रिका दिली जात आहे. गेल्या तीन आठवड्यांत पाचशेहून अधिक शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. आजवर १३५७ क्विंटल गहू, १५२७ क्विंटल तांदूळ व ४०८ क्विंटल साखरेची उचल रेशन दुकानांमधून करण्यात आली आहे. कुंभमेळ्यासाठी शासनाने घासलेटचा पुरवठा करावा, असा प्रस्ताव प्रशासनाने शासनाला पाठविला होता; परंतु शासनाने त्याकडे प्रारंभी दुर्लक्ष केले; मात्र आॅगस्ट महिन्यात जिल्ह्याला लागणाऱ्या एकूण घासलेटच्या कोट्यापेक्षा बारा हजार लिटर घासलेट अतिरिक्त उपलब्ध झाल्यामुळे ते सिंहस्थासाठी राखून ठेवण्यात आले आहे. आखाडे, खालशांनी मागणी केल्यास त्यांना ते दिले जाईल. दरम्यान, पर्वणीच्या काळात तीन दिवस साधुग्राममध्ये प्रवेशासाठी निर्बंध लादण्यात आल्याने रेशन दुकानांना पुरेसा अन्नधान्याचा साठा देण्यात आला असून, या काळात दुकाने सुरू राहतील, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांनी दिली. (प्रतिनिधी)