संकेत शुक्ल/नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये (दि. २०) मेळावा होणार होता. मात्र, हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे पवारांचा दौरा रद्द झाला. त्यामुळे अजित पवार गटाचा मेळावाही रद्द करण्यात आला.
विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटाने जिल्ह्यात कार्यकर्त्यांसाठी एकही कार्यक्रम घेतला नव्हता. त्यातच माजी मंत्री विद्यमान आ. छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात न आल्याने पक्षांतर्गत नाराजीनाट्य रंगले होते. त्यामुळे या मेळाव्याकडे कार्यकर्त्यांसह राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले होते. भुजबळ आणि अजित पवार एकाच व्यासपीठावरून काय बोलतात, याकडे लक्ष लागले होते. त्यासाठी नाशिकमधील रस्त्यांवर मोठमोठे बॅनरही लावण्यात आले होते.
नाशिक जिल्ह्यात अजित पवार गटाच्या आमदारांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे मंत्रिपदासह महामंडळाचे मोठे पदही या पक्षाकडे आहे. यासाठी मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. परंतु, अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये झालेला बिघाड प्रयत्न करूनही ते सुरू न झाल्याने पवारांनी दौरा रद्द केला. त्यामुळे मेळावा रद्द केला असून, तो पुन्हा कधी घ्यायचा, याबाबत नेत्यांशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली.