अजंगला वादळी पावसाने झोडपले

By Admin | Updated: June 12, 2014 00:46 IST2014-06-12T00:32:37+5:302014-06-12T00:46:03+5:30

मालेगाव : शहर तालुक्यात मंगळवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. या पावसामुळे ठिकठिकाणी झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले.

Ajang was overwhelmed with windy rain | अजंगला वादळी पावसाने झोडपले

अजंगला वादळी पावसाने झोडपले

मालेगाव : शहर तालुक्यात मंगळवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. या पावसामुळे ठिकठिकाणी झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले. त्यामुळे गावोगावचा वीजपुरवठा खंडित झाला. अनेक ठिंकाणी घरांचे तसेच काही शाळांचे पत्रे उडाले. कच्च्या घरांच्या भिंती कोसळल्या. येथील महसूल प्रशासनातर्फे सकाळपासून संपूर्ण तालुक्यात या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात येत आहे.
वडेल : परिसरात गेल्या अनेक वर्षात झाला नसेल अशा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. येथील नामदेव वाघ यांच्या घराचे संपूर्ण पत्रेच उडून गेले आहे. दिलीप चव्हाण यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने पत्र्यावर ठेवलेले दगड अंगावर पडून नाना चव्हाण हे गंभीर जखमी झाले. सुरेखा चव्हाण व सोनाली चव्हाणही जखमी झाल्या. भाऊसाहेब बोरसे यांच्या पायावर दगड पडून त्यांना गंभीर दुखापत झाली. सरपंच अनिल बच्छाव यांच्या मातोश्री चंद्रभागा बच्छाव यांच्या अंगावर मळ्यातील राहत्या घराची भिंत पडल्याने त्या जखमी झाल्या. या सर्वांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अजंग परिसरातील रावळगाव रस्त्यावरील इंदिरानगर भागातील रहिवासी कलाबाई कांतीलाल ठाकूर यांच्या घराचे पूर्ण छत उडालेले आहे. रामलाल सोनवणे या शेतमजुराच्या घरावर निंबाचे झाड कोसळून त्याचे पूर्ण घर उद्ध्वस्त झाले त्यांचा संपूर्ण संसारच उघड्यावर पडला आहे. डी. डब्ल्यू. पाटील या पोल्ट्री व्यावसायिकाचे पत्रे उडून पक्षी मृत्युमुखी पडल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. अजंग येथील संतोष भाऊ पेट्रोलपंपाचे डिझेल व पेट्रोलचे दोन्ही मशीन जमीनदोस्त झाले. अजंग प्राथमिक शाळेचे पत्रे उडाले. तेथे तातडीच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे. इंदिरानगर भागातील ठक्करबाप्पा सभागृहाचेही पत्रे उडाले. अजंग बसस्थानकालगतचे निंबाचे झाड कोसळल्याने त्याखालील सर्व दुचाकी या दाबल्या गेल्या.
गाव परिसरात या मृग नक्षत्राच्या पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. पेरणीपूर्व मशागतीत गुंतलेला शेतमजूर व शेतकरी हा पेरणीसाठीची तजवीजही घर दुरुस्तीत खर्च होईल की काय या चिंतेत बुडाला आहे.
चिंचावडला वीजपुरवठा खंडित
चिंचावड : परिसरात वादळी पावसाच्या तडाख्याने घरांचे नुकसान झाले. तसेच गावाचा वीजपुरवठा खंडित झाला.
चक्री वादळासह आलेल्या या पावसाने कौतिक काशिराम गांगुर्डे यांच्या पत्र्याच्या घराचे संपूर्ण नुकसान झाले. घरांच्या भिंती, घरातील गृहोपयोगी वस्तू तसेच गहू, बाजरी व धान्याचे संपूर्ण नुकसान झाले. कडू येता गुटले यांच्याही घराचे पत्रे उडून घरातील गृहोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. सुंदरबाई कडू गुटले या महिलेच्या डोळ्याला पत्रा लागून त्या जखमी झाल्या. त्यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरूआहेत. फुला उखा निकम यांच्या घरावरील संपूर्ण पत्रे उडाले. रघुनाथ काशिराम गांगुर्डे, कारभारी भिका बच्छाव, अर्चना प्रभाकर पवार, भगवान त्र्यंबक भामरे, दगा बापू भामरे, संजय त्र्यंबक भामरे, पुंडलिक शिवाजी देवरे, संभाजी शिवाजी देवरे, ज्ञानेश्वर शिवाजी देवरे, काशीनाथ पवार, तुकाराम पवार, भिका पवार, मुरलीधर नामदेव पवार आदि शेतकऱ्यांच्या घराचे नुकसान झाले. चिंचावड ते सौंदाणा व चिंचावड ते डोंगरगाव रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली. परिसरातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाला. गावातील काही गल्ल्यांमध्ये काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने संपूर्ण गावाचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे, असे वीज मंडळाचे कर्मचारी एस. एल. गोसावी यांनी सांगितले.
नुकसानीचा शासनाने पंचनामा करुन तत्काळ मदत द्यावी अशी मागणी सरपंच बापू बोरसे, मन्साराम जाधव, बाळासाहेब गांगुर्डे, बंडू गुंजाळ आदिंनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Ajang was overwhelmed with windy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.