एअर इंडिया विमानसेवेसाठी उत्सुक
By Admin | Updated: April 12, 2015 00:34 IST2015-04-12T00:24:29+5:302015-04-12T00:34:52+5:30
सहानी : विविध ठिकाणच्या पर्यायांचा विचार

एअर इंडिया विमानसेवेसाठी उत्सुक
नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विमानसेवा सुरू करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना एअर इंडियाचे पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. या कंपनीने नाशिकमधून विमानसेवा सुरू करण्याचा विचार करू, असे आश्वासन एअर इंडियाचे सहायक महाव्यवस्थापक हरजित सहानी यांनी देतानाच नाशिकमधून कोणत्या राज्यांना जोडणारी सेवा सुरू करता येईल, या पर्यायांची चाचपणी केली.
एअर इंडियाचे सहायक महाव्यवस्थापक हरजित सहानी आणि त्यांचे सहकारी विजय बैरागी यांनी विमानसेवेसंदर्भात शुक्रवारी नाशिकच्या महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्या सारडा संकुल येथील कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी सहानी यांनी हा मनोदय व्यक्त केला. नााशिकमधून कोणत्या भागांना जोडणारी विमानसेवा सुरू करता येईल, या विषयावर यावेळी चर्चा झाली. त्यानुसार नाशिक-मुंबई-बंगळुरू, नाशिक- पुणे- बंगळुरू, नाशिक- नागपूर- बंगळुरू, नाशिक- इंदोर- कोलकाता, त्याचप्रमाणे सिंगापूर, बॅँकॉक, पट्टाया आणि युरोपीय देशात अशी सेवा सुरू करणे सोयीचे ठरेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. नाशिकमधून सेवा सुरू करण्यास एअर इंडियाचे प्राधान्य राहील, असे मत यावेळी सहानी यांनी व्यक्त केले.
चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी प्रास्तावक केले. नाशिकमध्ये ओझर येथे सुसज्ज विमानतळ तयार आहे. त्याचा वापर आता सुरू झाला पाहिजे. नाशिकमध्ये नुकतीच टुरिझम कॉन्लेक्व झाली. यावेळी नाशिकला पर्यटकांना आणण्याची बहुतांशी टूर आॅपरेटर्सची इच्छा आहे. लवकरच कुंभमेळा सुरू होत आहे, त्यामुळे नाशिकमधून विमानसेवा सुरू करण्यास हीच संधी असल्याचे मत मंडलेचा यांनी व्यक्त केले आणि लवकरात लवकर सेवा सुरू करावी, अशी मागणी केली.
यावेळी चेंबरचे कार्यकारिणी सदस्य उमेश वानखेडे, तसेच भावेश मानेक यांच्या हस्ते सहानी आणि बैरागी यांचा सत्कार करण्यात आला. चर्चेत उमेश वानखेडे, संजय सोनवणे, प्रमोद पुराणिक, दिलीप बेनिवाल, राजू राठी, शशांक पहाडे यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)