: अनुदानित वसतिगृहांची अवस्था
By Admin | Updated: November 14, 2014 01:19 IST2014-11-14T01:19:08+5:302014-11-14T01:19:20+5:30
प्रत्यक्षात उपस्थित एकच उषा बच्छाव यांची अचानक तपासणी

: अनुदानित वसतिगृहांची अवस्था
नाशिक : जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती उषा बच्छाव यांनी देवळा व बागलाण तालुक्यातील समाजकल्याण विभागाअंतर्गत अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना दिलेल्या भेटीत अनेक धक्कादायक माहिती उघड झाली असून, विद्यार्थ्यांच्या पटसंख्येबाबतही प्रचंड तफावत आढळल्याने अनुदान लाटण्याचे प्रकार उघड होण्याची शक्यता आहे. समाजकल्याण सभापती उषा बच्छाव यांनी सभापती झाल्यानंतर प्रथमच अनुदानित वसतिगृह व आश्रमशाळांना भेटी दिल्या. देवळा तालुक्यातील कमला नेहरू छात्रालय- दहीवड, साने गुरुजी विद्यार्थी वसतिगृह- देवळा, पुष्पाताई हिरे विद्यार्थी वसतिगृह- उमराणे (देवळा), महात्मा फुले विद्यार्थी वसतिगृह- उमराणे (देवळा), महात्मा फुले विद्यार्थी वसतिगृह- करंजवाड (बागलाण) या आश्रमशाळा व वसतिगृहांना भेटी दिल्या. त्यातील एका वसतिगृहात विद्यार्थ्यांची पटसंख्या ४० दाखविलेली असताना प्रत्यक्षात एकच विद्यार्थी हजर असल्याचे पाहून उषा बच्छाव यांना धक्काच बसला. तसेच सर्वच वसतिगृह व आश्रमशाळांमध्ये आवश्यक शौचालयांची व्यवस्था नाही, शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही, विद्यार्थ्यांना गणवेश नाही, लेखन साहित्य अपूर्ण व विद्यार्थ्यांना वेळेवर नाश्ता मिळत नसल्याचे त्यांच्या भेटीत तसेच तपासणीत आढळून आले. याबाबत या सर्व अनागोेंदी कारभारात सुधारणा करण्याासाठी उषा बच्छाव या प्रशासनाशी चर्चा करणार आहेत. केलेल्या सूचनांनुसार सुधारणा न झाल्यास संस्थांच्या अनुदान कपातीसाठी शिफारस करणार असल्याचेही सभापती उषा बच्छाव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)