गंगापूर धरणातून शेतीसाठी पाणी
By Admin | Updated: November 23, 2015 23:22 IST2015-11-23T23:22:09+5:302015-11-23T23:22:33+5:30
मंत्रालयात बैठक : पालकमंत्री-आमदारात जुंपली

गंगापूर धरणातून शेतीसाठी पाणी
नाशिक : गंगापूर धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा व त्यातून नाशिक महापालिकेला प्रतिमानसी दीडशे लिटर पाणी दिल्यानंतर शिल्लक राहिलेल्या पाण्यातून सिंचन व बिगर सिंचनासाठी तीन आवर्तन देण्याची तयारी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दर्शविली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे कबूल करून पालकमंत्र्यांनी दिशाभूल केल्याचा आरोप आमदार जयंत जाधव यांनी केल्यामुळे बैठकीत गरमागरमी होऊन अखेर त्यांनी बैठकीचा त्याग केला.
शनिवारी नाशिक शहरात पाण्याच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांनी केलेले आंदोलन व लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या भावनांची दखल घेत मुंबईत सोमवारी दुपारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्'ातील सर्वच लोकप्रतिनिधी व पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सदरची बैठक दुपारी बारा वाजता होणार असल्यामुळे सर्व लोकप्रतिनिधी, नाशिक महापालिकेचे पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी आवर्जून उपस्थित होते. परंतु बारा वाजूनही मुख्यमंत्र्यांकडून कोणताही निरोप येत नसल्याचे पाहून लोकप्रतिनिधींमुळे चुळबूळ सुरू झाली, त्यातच पालकमंत्र्यांचाही पत्ता नसल्याचे पाहून सदरची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत नसल्याचा अंदाज लोकप्रतिनिधींना आला व त्यांनी संयुक्तपणे पालकमंत्र्यांच्या नावे पत्र लिहिले. या पत्रात, नाशिक येथे झालेल्या पाणी आरक्षण बैठकीत शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते, त्यावेळी शेतकरी व प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. परंतु सदरची बैठक मुख्यमंत्री घेणार नसतील तर सोमवारची बैठक रद्द करून हीच बैठक नाशिक येथे घेण्यात यावी, जेणे करून त्यात होणारे निर्णय शेतकऱ्यांना कळण्यास मदत होईल, असे नमूद करण्यात आले. या पत्रावर जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री चुंभळे, महापौर अशोक मुर्तडक, आमदार जयंत जाधव, नरहरी झिरवाळ, पंकज भुजबळ, योगेश घोलप यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. दुपारी दोन वाजता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक सुरू होताच, आमदार जयंत जाधव यांनी त्यांना पत्र सुपूर्द करून बैठकीला जर मुख्यमंत्री नसतील तर नाशिकच्या जनतेसमोरच ही बैठक होऊ द्या, अशी मागणी केली. त्यावर पालकमंत्र्यांनी नाशिकला एक बैठक झाली आहे, आता काय संबंध अशी विचारणा केली व मुख्यमंत्र्यांकडे तुम्हाला जायचे तर जा असा सल्ला दिला.
पालकमंत्री म्हणून तुम्हीच पुढाकार घ्या, असे जाधव यांनी त्यांना सांगितल्यावर महाजन यांनी, तुम्हाला बसायचे तर बसा नाही तर निघा, असे सांगितल्यावर आमदार जाधव यांनी, निषेध करीत बैठक त्याग केला. त्यानंतर बैठक सुरू झाली. या बैठकीस सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, अनिल कदम, योगेश घोलप, राजाभाऊ वाजे, बाळासाहेब सानप, नरहरी झिरवाळ, शेतकरी संघटनेचे अर्जुन बोराडे आदि उपस्थित होते.
तीन आवर्तने सोडण्याचे आदेश
नाशिकच्या गंगापूर धरणातील पाण्याचा विचार करता, काही पाणी दारणा धरणातूनही महापालिकेसाठी सोडायचे व गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्यातून सिंचनासाठी म्हणजेच शेतीसाठी तीन आवर्तने सोडण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. पालखेड समूहातूनही दोन नियमित आवर्तने सोडणे शक्य होणार असून, पाणी बचत झाल्यास प्रसंगी आणखी एक आवर्तन देण्याची तजवीज केली जाईल, असे सांगून महाजन यांनी, यावर्षी कमी पाऊस पडल्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, पुढच्या वर्षी तशी वेळ येणार नाही याची काळजी आत्तापासूनच घेण्यात येणार आहे. चणकापूर, केळझर, हरणबारी व पूनद या धरणांतील पिण्याच्या पाण्याचे सध्याचे आरक्षण बघता, गिरणा धरणातील पाण्यात कपात करण्यासाठी जळगाव जिल्हाधिकार्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले.