कर्मचाऱ्यांच्या उन्नतीसाठी करार
By Admin | Updated: July 17, 2017 00:08 IST2017-07-17T00:07:55+5:302017-07-17T00:08:12+5:30
नाशिक : गेल्या सोळा महिन्यांपासून रखडलेल्या करारामुळे राज्य परिवहन महामंडळातील १ लाख ८ हजार कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे

कर्मचाऱ्यांच्या उन्नतीसाठी करार
शिवाजी चव्हाण : एस. टी. कर्मचारी संयुक्त कृती समितीचा प्रादेशिक मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गेल्या सोळा महिन्यांपासून रखडलेल्या करारामुळे राज्य परिवहन महामंडळातील १ लाख ८ हजार कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. करार हा कामगारांच्या उन्नतीचा मार्ग असून, यासाठी कृती समिती कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन कामगार सेनेचे कार्याध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनी केले. कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतन कराराच्या पार्श्वभूमीवर शालिमार येथील शिवसेना भवन येथे नाशिक संयुक्त कृती संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर कामगार सेनेचे राज्य संघटक सचिव सुभाष जाधव, इंटकचे जी. आर. पाटील, श्रीरंग बरगे, मनसे कामगार संघटनेचे मोहन चावरे, कास्ट्राईबचे अरविंद जगताप, यांत्रिक संघटनेचे के. आर. टोंगळे उपस्थित होते. यावेळी चव्हाण म्हणाले, करार हा कामगारांचा हक्क असून, करारामध्येच कर्मचाऱ्यांचे आर्थिक हित आहे. आयोगाप्रमाणे वेतनाची अपेक्षा करणे गैर असून, प्रशासनाने नाकारलेले असतानाही आयोगाची अपेक्षा करणे म्हणजे कामगारांचे नुकसान करण्यासारखे आहे. प्रशासन कराराच्या बाजूने असतानाही जर करारास विलंब होत असेल तर कामगार संघटना हे कर्मचाऱ्यांची दिशाभूल करीत आहे. कृती समितीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल, असे चव्हाण यावेळी म्हणाले. याप्रसंगी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कृती समितीने प्रशासनाला सादर केलेल्या मसुद्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा, अशी अपेक्षा अनेक मान्यवरांनी भाषणातून व्यक्त केली. करारास विलंब होत असेल तर त्याची जबाबदारी प्रशासनाने निश्चित केली पाहिजे. कामगार संघटना कर्मचाऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही यावेळी मान्यवरांनी केला. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील एस.टी. कामगारांचे वेतन हे ४५ ते ५० टक्के कमी आहेत. याबाबत कामगार संघटनेकडून यापूर्वीच्या करारामध्ये काहीच
केले नसल्याचा आरोपही करण्यात आला. वेतन आयोगानुसार नव्हे तर कराराच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे हित साधले जाईल, असा सूर मेळाव्यात उमटला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवा सांगळे यांनी केले. तर श्याम इंगळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कृती समितीच्या १३ संघटनांचे प्रतिनिधी आणि कर्मचारी उपस्थित होते.