आगाराचे व्यवस्थापन कोलमडले
By Admin | Updated: May 3, 2016 00:29 IST2016-05-02T23:29:20+5:302016-05-03T00:29:33+5:30
आगाराचे व्यवस्थापन कोलमडले

आगाराचे व्यवस्थापन कोलमडले
नांदगाव : लग्नाच्या दाट तिथीलाच अनेक बसेस रद्द झाल्याने प्रवाशांचे हालनांदगाव : लग्नाच्या दाट तिथीलाच नांदगाव आगाराच्या अनेक बसचे शेड्युल रद्द झाल्याने शेकडो प्रवाशांचे हाल झाले. त्यामुळे खासगी वाहतूकदारांची मात्र चंगळ झाली.
३० एप्रिल रोजी नांदगावहून नाशिक येथे जाणाऱ्या दुपारी १२, १ व २ वाजेच्या बसेस गेल्या नाहीत. त्यामुळे बसस्टँड व शनिमंदिर थांब्यावर प्रवाशांची खूप गर्दी झाली. विशेष म्हणजे या वेळेत बसस्थानकावर एकही जबाबदार नियंत्रक उपस्थित नव्हते.
आगार व्यवस्थापक गुलाब बच्छाव, सहायक वाहतूक निरीक्षक एन. एस. बोरसे व सहायक कार्यशाळा अधीक्षक सुभाष पाटील हे तिघेही एकाच गाडीने मालेगाव येथे ये-जा करत असतात, अशी तक्रार आहे. गाड्या रद्द होण्याच्या कालावधीत या तीन अधिकाऱ्यांपैकी कोणीही हजर नव्हते. वाहतूक निरीक्षक विनोद इप्पर पण नव्हते.
दैनंदिन कर्तव्य कालावधीत हे अधिकारी अनेकदा उपस्थित नसतात, अशी माहिती प्रवाशांकडून मिळाली. आगार व्यवस्थापक बच्छाव नुकतेच त्यांच्या ३९ दिवसांच्या निलंबन कालावधीनंतर हजर झाले आहेत.
चालक व वाहकांच्या ड्यूटी लावताना वशिलेबाजीचा आरोप केला जातो. प्रशासनाने कार्यक्षम व किफायतशीर व्यवस्थापनासाठी चालक व वाहकांचे तीन भाग केले आहेत. ‘ए’ मध्ये १० पेक्षा अधिक वर्षे सेवा झालेले ज्यांना अतिरिक्त वेळेसाठी प्रतितास २०० रु.पेक्षा अधिक रक्कम मिळते. ‘बी’ मध्ये समाविष्ट कर्मचाऱ्यांची सेवा ३ ते १० वर्षे असते, त्यांना त्यापेक्षा कमी व ‘क’ मध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ८० रु. प्रतितास असा दर आहे.
यात वशिलेबाजीने ‘ए’ कर्मचाऱ्यांना लांब पल्ल्यावरील गाड्यांची नेमणूक मिळते. त्यात अधिकारी व ‘ए’ वर्गातील चालकांचे संगनमत असते, असा आक्षेप
घेण्यात येतो. मात्र यामुळे महामंडळाला अधिक खर्च
पडतो. आगार व्यवस्थापकांच्या निलंबनामागे हे एक कारण असल्याचे बोलले जाते.
ऐन गर्दीच्या सीझनमध्ये लागोपाठ तीन नाशिक गाड्या रद्द झाल्याने नांदगाव आगाराचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शिवाय प्रवाशांचा कित्येक तास खोळंबा झाला तो वेगळाच.
वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून संबंधितांवर कडक कारवाई करावी, तसेच येथील आगार व्यवस्थापनात सुधारणा करावी, अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विलासराव साळुंके यांनी केली आहे. (वार्ताहर)