पासवर्ड हॅकिंग प्रकरणात ‘त्या’ एजंटचा सहभाग?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 19:16 IST2017-08-23T19:13:02+5:302017-08-23T19:16:07+5:30

पासवर्ड हॅकिंग प्रकरणात ‘त्या’ एजंटचा सहभाग?
नाशिक- प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वयंचलित वाहन तपासणी मोटार परिवहन निरीक्षकाचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड चोरून व्यावसायिक वाहने तपासणीसाठी न आणता फिटनेस प्रमाणपत्र देण्यास परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने या प्रकरणाशी एका एजंटचा सहभाग असल्याची दबक्या आवाजात चर्चा आरटीओ कार्यालयात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी एका एजंटने अशाच प्रकारे कार्यालयातील एका कर्मचाºयाचा पासवर्ड चोरून आरटीओत वाहनांची बनावट पावत्यांच्या आधारे नोंदणी करून शासनाचा जवळपास १८ लाख रुपयांचा कर बुडवून फसवणूक केल्याचाही प्रकार उघडकीस आला होता त्यामुळे आयडी आणि पासवर्ड चोरी प्रकरणाशी या एजंटचा सहभाग आहे का याची तपासणी करणेही गरजेचे ठरणार आहे.
देशातील पहिलेच स्वयंचलित केंद्र म्हणून नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाची ओळख आहे. कार्यालयातील बहुतांशी कामे ही आरटीओ अधिकारी व एजंट यांच्यातील संगनमताने एजंटच्या माध्यमातूनच केली जातात. कार्यालयीन कर्मचारी व एजंट यांच्यातील ‘अर्थपूर्ण’ मैत्रीच्या संबंधामुळे कोणत्या संगणकावर कोणते काम चालते याची बहुतांश माहिती ही एजंटांनाही आहे त्यामुळे अधिकाºयांचे लॉगिन आयडी तसेच पासवर्डदेखील काही एजंटांना माहिती असल्याची उघडपणे चर्चा आहे.
काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एका एजंटने कार्यालयीन कर्मचाºयांच्या मदतीने ज्या संगणकावर वाहन नोंदणीचे काम चालते त्या संगणकावर काम करणाºया कर्मचाºयाच्या संगणकावर नोंदीत फेरफार करून महागड्या व आलिशान वाहनांचा कर भरल्याच्या बनावट पावत्यांच्या आधारे नोंदणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. संबंधित एजंटने तब्बल १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एजंटसह कार्यालयातील काही कर्मचाºयांवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा सर्व प्रकार एजंट व कार्यालयीन अधिकारी तसेच कर्मचाºयांच्या संगनमताने झाल्याची चर्चा होती त्यावेळी आरटीओने काही वाहनेदेखील जप्त केली होती.
चार दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या प्रकरणाबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाशी त्यावेळच्या त्या एजंटचाही संबंध आहे का? याची चौकशी करणेही पोलिसांना गरजेचे ठरणार असले तरी सध्या आरटीओत एजंटगिरी करणाºयांत पूर्वीच्याच एजंटचा सहभाग असल्याचे उघडपणे बोलले जात आहे.