कांदाप्रश्नी शेतकरी संतप्त
By Admin | Updated: July 29, 2016 01:33 IST2016-07-29T01:29:33+5:302016-07-29T01:33:43+5:30
जिल्ह्यात आंदोलन : गोणी लिलावाला विरोध

कांदाप्रश्नी शेतकरी संतप्त
नाशिक : प्रचलित पद्धतीने कांदा खरेदी करावा आणि कांद्याला हमीभाव द्यावा, या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. कळवण तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला, तर देवळा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पिंंपळगाव बसवंत येथे शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले.
गोणी लिलाव पद्धतीला विरोध म्हणून जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलने करण्यात येत आहेत. गुरुवारी कळवण तालुका बंद करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन शहरात व तालुक्यात आज सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये गुरुवारी संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव काही काळ बंद पाडला. पूर्वीच्या पद्धतीनेच कांदा निलाव झाला पाहिजे या मागणीसाठी ठाम असल्याने शेतकऱ्यांनी दुपारी ४ वाजता लिलाव रोखून धरला. अखेर बाजार समितीचे लिलावप्रमुख दीपक गवळी यांनी शेतकरी वर्गाची मागणी नोंदविण्यात आल्यावर लिलाव सुरू केला. देवळा येथील पाचकंदील येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महसूल विभागाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
अभोणा येथे गोणीमध्ये कांदा विक्री विरोधात सर्वपक्षीय कडकडीत बंद पुकारून शहरातील सर्व दुकाने बंद ठेवत व्यापारी वर्गानेही शेतकऱ्यांच्या मागणीस पाठिंबा दर्शविला. अभोण्यासह कनाशी, निवाणे, पश्चिम पट्ट्यातील प्रमुख गावांमध्ये शेतकरी संतापाचा उद्रेक आज बंद पाळून बघावयास मिळाला.