उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ राज ठाकरे यांचेही नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन
By संजय पाठक | Published: February 16, 2024 11:35 AM2024-02-16T11:35:55+5:302024-02-16T11:36:16+5:30
वर्धापन दिनाचा कार्यक्रम होणार
संजय पाठक
नाशिक- शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महा अधिवेशन गेल्या महिन्याच्या अखेरीस नाशिकमध्ये पार पाडले यावेळी उद्धव ठाकरे यांनी शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पाठोपाठ आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. येत्या नऊ मार्चला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन असून तो नाशिकमध्ये भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने नाशिक मध्ये जाहीर सभेचे नियोजन करण्यात येत आहे.
2006 मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबई पुण्यापाठोपाठ नाशिक मध्ये सर्वाधिक समर्थन मिळाले. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे नाशिक शहरात तीन आमदार निवडून आले होते. तर 2012 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत 40 नगरसेवक निवडून आले होते. पाच वर्ष मनसेने महापालिकेतील सत्ता उपभोगली होती.
या कालावधीत अनेक चांगले प्रकल्प उभारल्याचा दावा मनसेच्या वतीने केला जातो.
त्यानंतर मात्र मनसेला अपेक्षित यश आलं नाही मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नाशिककडे लक्ष केंद्रित केले आहे गेल्या महिन्यात राज ठाकरे दोन दिवस नाशिक मध्ये होते. त्यानंतर आता येत्या 9 मार्चला नाशिक मध्ये मनसेचा वर्धापन दिन साजरा करण्याचे नियोजन आहे. नाशिकच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात सभा घेण्याचे नियोजन आहे. या संदर्भात आज मुंबई येथे बैठकही होणार आहे, अशी माहिती मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी दिली.