लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यव्यापी शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन आठवड्याच्या विलंबानंतर देवळा येथील शनिवारी भरणाऱ्या बाजारात लोणच्यासाठी लागणाऱ्या कैरीचे आगमन झाल्याने खरेदीसाठी एकच झुंबड उडाली होती.महाराष्ट्रीयन जेवणात कैरीचे लोणचे नसेल तर जेवणाची सारी लज्जत जाते त्यामुळे वर्षभर पुरेल इतके लोणचे गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक घरात बनविले जाते. पावसाळ्याच्या सुरुवातीला पहिला पाऊस पडल्यानंतर लोणच्याची कैरी बाजारात उपलब्ध होते. चालू हंगामात मात्र सगळीकडे मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. परंतु १ जूनपासून राज्यव्यापी शेतकरी संपामुळे यावर्षी कैरी बाजार भरतो की नाही या संभ्रमात लोणचे प्रेमी होते. त्यात देवळ्यामध्ये शनिवारी व रविवारी भरणाऱ्या कैरी बाजारात दोन आठवड्यापासून कैरी विक्रीस न आल्याने ग्राहकांमध्ये चलबिचल सुरू होती; मात्र आज सकाळी लोणच्याच्या बाजारात कैरीचे आगमन झाल्याने संपूर्ण तालुक्यातून कैरी खरेदीसाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली. यावेळी विविध प्रकारच्या कैरी विक्रीसाठी आल्या होत्या. बऱ्याच ग्राहकांचा कल हा गावठी वाण खरेदीकडे होता.
दोन आठवड्यानंतर देवळ्यात भरला बाजार
By admin | Updated: June 12, 2017 00:50 IST