निरोप कसला घेता, फिरूनी येणार परतुनि!
By Admin | Updated: January 7, 2017 01:11 IST2017-01-07T01:09:54+5:302017-01-07T01:11:16+5:30
सदस्यांचा आशावाद : अखेरच्या महासभेत भावनांचा कल्लोळ

निरोप कसला घेता, फिरूनी येणार परतुनि!
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यास अवघे काही दिवस उरले असताना अखेरच्या महासभेत एकमेकांचा निरोप घेत सदस्यांनी मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. पाच वर्षांत प्रभागांमध्ये झालेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त करतानाच सदस्यांनी ‘निरोप कसला घेता, फिरूनी येणार परतुनि’ असा आशावादही जागविला.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने महासभेत कोणताही आर्थिक व धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही, अशी माहिती प्रारंभीच नगरसचिव ए. पी. वाघ यांनी सभागृहाला करून दिली. त्यामुळे केवळ इतिवृत्तांना मंजुरी देत सदस्यांनी निरोपाच्या भाषणाला सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांत खूप शिकायला मिळाले. प्रभागांमध्ये आवश्यक कामांसाठी पाठपुरावा केला. सर्वांनी पक्षभेद विसरून एकमेकांना साथ दिली. काही कटू प्रसंग आले असतील, परंतु त्याचा राग कुणी मनात धरला नाही. प्रभागांमध्ये कामे झाली. काही अपुरी राहिली. हसत-खेळत पाच वर्षे निघून गेली. आता केलेल्या कामांच्या बळावर पुन्हा आम्ही सभागृहात येऊ, असा विश्वासही सदस्यांनी बोलून दाखविला. उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी मावळतीचा जल्लोष हा उद्याच्या उगवतीचा आनंद घेऊन येईल, असे सांगत सभागृहाने पाच वर्षांत काही चांगले पायंडे पाडल्याचा आवर्जून उल्लेख केला. कामकाज करताना मते-मतांतरे असतात परंतु मनभेद नसावेत. सिंहस्थ कुंभमेळ्याचे यशस्वी नियोजन झाले.
अधिकारीवर्गानेही कामकाजाला चांगली साथ दिल्याची पावतीही उपमहापौरांनी दिली, तर स्थायी समितीचे सभापती सलीम शेख यांनी पक्षाबद्दल कृतज्ञतेचा भाव व्यक्त करत शहरात मनसेच्या सत्ताकाळात मोठ्या प्रमाणावर कामे झाल्याचे सांगितले. सभागृहनेत्या सुरेखा भोसले यांनीही पाच वर्षांत झालेल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक यांनी सर्वांच्या सहकार्याने चांगले कामकाज करता आल्याचे सांगितले. यावेळी शिक्षण सभापती संजय चव्हाण, अजय बोरस्ते, शिवाजी गांगुर्डे, प्रकाश लोंढे, सुधाकर बडगुजर, सचिन महाजन, तानाजी जायभावे, उद्धव निमसे, नीलिमा आमले, कल्पना पांडे, यशवंत निकुळे, विलास शिंदे, रंजना पवार, शोभा आवारे, सुनंदा मोरे, सुजाता डेरे यांनीही मनोगत व्यक्त केले.