पक्षांतर केलेल्या काही नगरसेवकांना पश्चातबुद्धी
By Admin | Updated: January 26, 2017 00:18 IST2017-01-26T00:18:38+5:302017-01-26T00:18:55+5:30
मनसेचा दावा : पुन्हा एण्ट्री न देण्याचा निर्णय

पक्षांतर केलेल्या काही नगरसेवकांना पश्चातबुद्धी
नाशिक : पक्ष सोडून गेलेल्या काही नगरसेवकांना पश्चातबुद्धी होत त्यांच्याकडून वेगवेगळ्या माध्यमातून पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी संपर्क साधला जात असल्याचा दावा मनसेचे संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर यांनी केला आहे. मात्र, पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही अभ्यंकर यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय मनसेने घेतला असून, सर्वच्या सर्व १२२ जागांसाठी मंगळवारपासून (दि. २४) ‘राजगड’ कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर, सोमवारी (दि. २३) मनसेचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन महापालिका निवडणुकीसाठी रणनीती निश्चित करण्यात आली. काही निर्णय घेण्यात येऊन प्रचारयंत्रणेचीही रूपरेषा ठरविण्यात आली. याचवेळी पक्ष सोडून गेलेल्या काही नगरसेवकांनी पुन्हा पक्षाकडे संपर्क साधत उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचा मुद्दा चर्चेला आला. मात्र, पक्ष सोडून गेलेल्या एकाही नगरसेवकाला उमेदवारी न देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मनसेचे दरवाजे संबंधित नगरसेवकांना कायमचे बंद झाले असून सेना-भाजपात उमेदवारी न मिळाल्यास त्यांची स्थिती ‘ना घरका ना घाटका’ अशी होणार आहे. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवित अन्य पक्षातीलही काही इच्छुक उमेदवार पक्षाच्या संपर्कात असून, त्यातील काहींनी मुलाखतीला हजेरीही लावल्याचे अविनाश अभ्यंकर यांनी सांगितले.