सहा वर्षांनंतर श्रेयस पुन्हा मराठीत तळपणारपो

By Admin | Updated: July 19, 2014 20:35 IST2014-07-19T00:16:52+5:302014-07-19T20:35:44+5:30

पोश्टर बॉईज : ‘सनई चौघडे’ नंतर दुसरी निर्मिती, १ आॅगस्टला होणार प्रदर्शित

After six years, Shreyas will be back in Marathi | सहा वर्षांनंतर श्रेयस पुन्हा मराठीत तळपणारपो

सहा वर्षांनंतर श्रेयस पुन्हा मराठीत तळपणारपो

नाशिक : सन २००८ मध्ये ‘सनई चौघडे’ या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मितीक्षेत्रात पाऊल ठेवणारा अभिनेता श्रेयस तळपदे आता दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपटाच्या निर्मितीकडे वळाला असून, त्याचा ‘पोश्टर बॉईज’ चित्रपट येत्या १ आॅगस्टला प्रदर्शित होत आहे. ज्या भाषेने आणि मातीने मला घडविले तिच्याबद्दल कृतज्ञता म्हणून मी मराठी चित्रपटाच्या निर्मिती क्षेत्रात वळालो असून, ‘पोश्टर बॉईज’ ही माझी पहिलीच स्वतंत्र निर्मिती असल्याचे श्रेयस तळपदे याने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सुभाष घई यांच्या मुक्ता आर्टस्च्या बॅनरखाली श्रेयस तळपदे याने ‘सनई चौघडे’ची निर्मिती केली होती. त्यानंतर श्रेयस तळपदे याने हिंदीत आपले बस्तान बसविले होते. आता दीर्घ कालावधीनंतर तळपदेचे होम प्रॉडक्शन ‘पोश्टर बॉईज’ प्रदर्शित होत आहे. स्वतंत्र बॅनरखाली आपल्या पहिल्या चित्रपटाविषयी श्रेयस तळपदे याने सांगितले, पोश्टर बॉईज या चित्रपटात तीन सामान्य माणसांची गंमतीशीर कथा आहे. पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेच्या पोश्टरवर तिघे झळकतात आणि तेथून उडणारी धम्माल या चित्रपटात प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. चित्रपटात पुरुष नसबंदीविषयी कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.
चित्रपटातून काय बोध घ्यायचा हे प्रेक्षकांवर सोडण्यात आले आहे. सनई चौघडेनंतर मी स्वतंत्रपणे मराठी चित्रपटाची निर्मिती करतो आहे. मराठीविषयी असणारा जिव्हाळा हेच त्यापाठीमागचे कारण आहे. याचा अर्थ हिंदी करणारच नाही, असे नाही. चित्रपटात दिलीप प्रभावळकर, हृषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव, पूजा सावंत व नेहा जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भारताबाहेर प्रसिद्ध असलेले संगीतकार लेस्ली लुईस यांनी पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला संगीत दिले असल्याचेही तळपदे यांनी सांगितले. यावेळी लेखक व दिग्दर्शक समीर पाटील यांनी चित्रपटाच्या कथानकाविषयी माहिती दिली. (प्रतिनिधी)

Web Title: After six years, Shreyas will be back in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.