सहा महिन्यांनंतर अंदाजपत्रकाला मुहूर्त
By Admin | Updated: August 19, 2015 00:05 IST2015-08-19T00:05:17+5:302015-08-19T00:05:48+5:30
महापालिका : २५ आॅगस्टला विशेष अंदाजपत्रकीय सभा

सहा महिन्यांनंतर अंदाजपत्रकाला मुहूर्त
नाशिक : महापालिकेच्या सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाला अखेर तब्बल सहा महिन्यांनंतर मुहूर्त लागला असून, येत्या २५ आॅगस्टला सकाळी ११.३० वाजता विशेष अंदाजपत्रकीय सभा आयोजित करण्यात आली आहे. महासभेच्या मंजुरीअभावी अंदाजपत्रक रखडल्याने प्रशासकीय कामकाजात अडथळे उत्पन्न झाले असून, विकास कामांचाही खोळंबा झाला आहे. दरम्यान, एलबीटी रद्द झाल्यामुळे उत्पन्नात होणारी घट लक्षात घेता महासभेकडून अंदाजपत्रकात वाढ सुचविण्याची शक्यता कमी झाली आहे.
सन २०१५-१६ या वर्षासाठी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दि. २० फेब्रुवारी रोजी स्थायी समितीचे तत्कालीन सभापती राहुल ढिकले यांना १४३७ कोटी ६७ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. स्थायी समितीवर अंदाजपत्रकावर चर्चा होऊन समितीने अपेक्षेप्रमाणे घरपट्टी व पाणीपट्टीतील दरवाढ फेटाळली होती. त्यानंतर स्थायी समितीकडून महासभेवर अंदाजपत्रक मंजुरीसाठी ठेवणे अपेक्षित असताना त्याला मात्र विलंब झाला. स्थायी समितीचे माजी सभापती राहुल ढिकले व विद्यमान सभापती शिवाजी चुंभळे हे दोघेही नंतर जिल्हा सहकारी बॅँक निवडणुकीत गुंतल्याने अंदाजपत्रक रखडले. त्यामुळे प्रशासनालाही कामकाज करताना अडचणी उत्पन्न होऊ लागल्या. विकासकामांचा खोळंबा झाला. मागील महिन्यात आयुक्तांनी तर स्थायी समितीच्या बैठकीतच अंदाजपत्रक तातडीने महासभेवर मंजुरीसाठी ठेवण्याची विनंती स्थायीला केली होती.
त्यानुसार, स्थायी समितीने २०-२५ दिवसांपूर्वी अंदाजपत्रकात ३३२ कोटी ३० लाख रुपयांची वाढ सुचवत १७६९ कोटी ९७ लाख रुपयांचे प्रारूप अंदाजपत्रक प्रशासनाकडे पाठविले. आता तब्बल सहा महिन्यांनंतर महापौरांनी येत्या २५ आॅगस्टला विशेष अंदाजपत्रकीय सभा बोलाविली आहे. (प्रतिनिधी)