प्रसादला पाहून कुटुंबीयांचे डोळे पाणावले
By Admin | Updated: April 14, 2016 00:45 IST2016-04-14T00:21:37+5:302016-04-14T00:45:49+5:30
प्रसादला पाहून कुटुंबीयांचे डोळे पाणावले

प्रसादला पाहून कुटुंबीयांचे डोळे पाणावले
नाशिकरोड : २५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या साडेपाच वर्षाच्या प्रसाद पोरजे याला बुधवारी दुपारी सुखरूपपणे पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. प्रसादला सुखरूप मिळविण्यासाठी पोलीस प्रशासनाने घेतलेली खबरदारी व मेहनत बघून वडनेरदुमालावासीयांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार केला. दरम्यान अपहरण व खंडणीच्या गुन्ह्यातील दुसरा फरार आरोपी याच्यादेखील उत्तर प्रदेशमध्ये जाऊन पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
वडनेरदुमाला येथे संपत पोरजे यांच्या गोठ्यात काम करणारा गडी कामगार राजू ऊर्फ राकेश घनीराम पटेल व त्याच्या एका सहकाऱ्याने पोरजे यांचा साडेपाच वर्षाचा मुलगा प्रसाद याचे शनिवारी सायंकाळी अपहरण करून २५ लाखांची खंडणी मागितली होती. या घटनेची पोलीस प्रशासनाच्या विविध विभागाने गोपनीयता बाळगत तांत्रिकदृष्ट्या तपास करून संशयित राजू पटेल याचा मार्ग शोधून काढला. पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस नाईक सुनील पाचरणे यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी जबलपूरपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या गोशलपूर या गावातून प्रसाद याला सुखरूपपणे ताब्यात घेत संशयित राजू पटेलच्या मुसक्या आवळल्या.
मुलगा प्रसाद व संशयित राजू याला घेऊन पोलिसांचे पथक सकाळी नाशिकरोडला दाखल झाले. उपनगर पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रसाद याला त्याच्या कुटुंबीयांच्या सुखरूप स्वाधीन केले. यावेळी सर्वांचे डोळे पाणावले होते; मात्र पोलीस प्रशासनाची एकजूट, मेहनत व बाळगलेली गोपनीयता बघून वडनेरवासीयांची छाती अभिमानाने फुलल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. यावेळी पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, क्राइम ब्रॅँचचे सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, पोलीस तांत्रिक विभागाचे पोलीस निरीक्षक आर.डी. कुटे, सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ माळी, उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस नाईक सुनील पाचरणे आदिंचा नगरसेवक केशव पोरजे, माजी नगरसेवक प्रभाकर पाळदे, महेंद्र पोरजे, विलास पोरजे, वाळू पोरजे आदिंच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भावनाप्रधान या कार्यक्रमात पोरजे कुटुंबीय व वडनेरवासीयांचे डोळे पाणावले होते. यावेळी शेखर भालेराव, संजय गायकवाड, रमेश आहेर, अजित गायकवाड, भास्कर सातव आदिंसह वडनेरचे ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)