कुचराई केल्यास राजीनामे हातात : पालकमंत्र्यांचा इशारा

By Admin | Updated: March 14, 2017 17:25 IST2017-03-14T17:25:53+5:302017-03-14T17:25:53+5:30

नाशिककरांनी मोठ्या विश्वासाने भाजपाला एकहाती सत्ता सोपविली आहे.

After resignation, resignation: Guardian Minister's warning | कुचराई केल्यास राजीनामे हातात : पालकमंत्र्यांचा इशारा

कुचराई केल्यास राजीनामे हातात : पालकमंत्र्यांचा इशारा

नाशिक : नाशिककरांनी मोठ्या विश्वासाने भाजपाला एकहाती सत्ता सोपविली आहे. त्यामुळे महापौर- उपमहापौरांसह पक्षाच्या सर्वच नगरसेवकांकडून पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त कारभारावर भर दिला जाईल. महापालिकेच्या कामकाजात आपण स्वत: जातीने लक्ष पुरविणार असून, पारदर्शकतेचा अभाव आणि कामकाजात कुचराई झाल्याचे आढळल्यास आपल्या हाती महापौर- उपमहापौरांचे राजीनामे तयार असल्याचा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध पार पडल्यानंतर नवनिर्वाचित महापौर रंजना भानसी आणि उपमहापौर प्रथमेश गिते यांचा सत्कार पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी सांगितले, आजचा दिवस भाजपासाठी ऐतिहासिक आहे. नाशिककरांनी स्पष्ट बहुमत देत भाजपावर विश्वास दाखविला आहे. त्यामुळे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. विरोधी पक्षांनीही एकमताने भाजपा उमेदवारांची निवड केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पारदर्शी कारभाराची हमी दिलेली आहे आणि त्यांनी नाशिक शहर दत्तकही घेतले आहे.

त्यामुळे महापालिकेत पारदर्शी कारभारावर सर्वांचाच भर असणार आहे. स्वत: मी कामकाजात जातीने लक्ष घालणार आहे. सर्व नगरसेवकांनाही पारदर्शी कारभारासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. भाजपाने महापौरपदी रंजना भानसी यांच्यासारख्या अनुभवी सदस्याची निवड केली आहे. त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे. कामकाजात कुठे कुचराई आढळल्यास महापौर- उपमहापौरांनी तारीख न टाकलेले राजीनामे देऊन ठेवलेले आहेतच, असेही महाजन यांनी स्पष्ट केले. भाजपाच्या सत्ताकाळात वचननाम्याची पूर्ण अंमलबजावणी करण्यात येईल. वचननामा बनविताना नाशिककरांकडून मागविण्यात आलेल्या आॅनलाइन सूचनांचा विचार करण्यात आला आहे. आगामी काळात विमानतळ, किकवी धरण, औद्योगिक वसाहतीच्या समस्या, स्वच्छता आदि मुद्द्यांना प्राधान्य देण्यात येईल. स्मार्ट सिटीसाठी मोठा निधी केंद्र व राज्य सरकारकडून येणार आहे. निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. गोदावरी नदी प्रदूषणासंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

 

Web Title: After resignation, resignation: Guardian Minister's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.