तुलसीविवाहानंतर लग्नसराईस प्रारंभ
By Admin | Updated: November 24, 2015 22:26 IST2015-11-24T22:26:11+5:302015-11-24T22:26:46+5:30
तुलसीविवाहानंतर लग्नसराईस प्रारंभ

तुलसीविवाहानंतर लग्नसराईस प्रारंभ
साकोरा : दिवाळी संपताच सर्वांना वेध लागतात ते तुळशीच्या विवाहाचे. त्यानंतर लग्नसराई सुरू होते. सोमवारी तुलसीविवाहानंतर लग्नसराई सुरू झाली आहे. यंदा मात्र सिंहस्थ कुंभमेळा, कोकिळाव्रत तसेच अधिकमासामुळे लग्नमुहूर्त नाहीत, असा अनेकांचा समज झाला होता. परंतु तुलसीविवाहानंतर लगेचच २४ नोव्हेंबर हा पहिलाच लग्न मुहूर्त असून, एप्रिलपर्यंत एकूण ७४ विवाह तारखा असल्याचे पंचांगानुसार सांगण्यात आले आहे.
तुळसीच्या लग्नानंतर लगेचच वधू-वर पिता जन्मपत्रिका घेऊन पुरोहितांकडे धाव घेतात. मंगलकार्यालय, शाऴा, महाविद्यालयांची शोधाशोध सुरू होते. निसर्गाच्या लहरीपणामुळे ग्रामीण भागातील बळीराजा पूर्णपणे हताश झाला असून, त्याची परिस्थिती नसतानादेखील दरवर्षी लग्नसराईत लग्नांची संख्या जेमतेम आहे. या वर्षीदेखील पाऊस कमी असल्याने शेतीसाठी झालेला खर्च भरून निघाला नाही. मुला-मुलींचे लग्न कर्ज घेऊन का होईना करावेच लागेल. त्यामुळे या वर्षीदेखील लग्नसमारंभ धूमधडाक्यात पार पडतील. येणाऱ्य मे महिन्यात एकच लग्न तिथी असून, काही पंचांगानुसार यंदा अनेक चांगले मुहूर्त असले तरी मे-जूनदरम्यान शुक्राच्या अस्तामुळे सुट्ट्याच्या काळात लग्न समारंभ
नाहीत. काही पंचांगात काही
विधीनंतर शुक्र अस्तात विवाह होऊ शकतात, असे पुरोहितांकडून सांगण्यात येत आहे. (वार्ताहर)