सभापतिपदासाठी सर्व पक्ष बोहल्यावर
By Admin | Updated: July 3, 2015 00:01 IST2015-07-03T00:01:25+5:302015-07-03T00:01:43+5:30
शिक्षण समिती निवडणूक : सभापती, उपसभापतीसाठी १२ अर्ज

सभापतिपदासाठी सर्व पक्ष बोहल्यावर
नाशिक : महापालिका शिक्षण समिती सभापतिपदासाठी सर्वच पक्षांनी बोहल्यावर चढण्याची तयारी केली असून, सभापतिपदासाठी ७, तर उपसभापतिपदासाठी ५ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. येत्या शनिवारी (दि.४) सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सत्ताधारी महाआघाडीमार्फत सभापतिपदासाठी अपक्ष संजय चव्हाण आणि उपसभापतिपदासाठी मनसेचे गणेश चव्हाण हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
शिक्षण समिती सभापती-उपसभापतिपदासाठी गुरुवारी सकाळी ११ ते १ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. सर्वात प्रथम कॉँग्रेसच्या वत्सला खैरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर त्यांच्यापाठोपाठ कॉँग्रेसच्याच योगीता अहेर यांनीही अर्ज दाखल केल्याने कॉँग्रेसचे दोन्ही सदस्य रिंगणात उतरले आहेत. कॉँग्रेसच्या दोन्ही सदस्यांनी सभापती-उपसभापतिपदासाठी अर्ज दाखल केले. कॉँग्रेसच्या उमेदवारांसोबत पक्षाचे कुणीही नगरसेवक अथवा पदाधिकारी उपस्थित नव्हते. शिवसेना-भाजपाच्या उमेदवारांनी एकत्र जाऊन आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेकडून सभापती-उपसभापतिपदासाठी हर्षा बडगुजर, तर भाजपाकडून दोन्ही पदांकरिता ज्योती गांगुर्डे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी सेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, भाजपाचे गटनेते संभाजी मोरुस्कर आदिंसह नगरसेवक उपस्थित होते. अपक्ष गटाचे संजय चव्हाण यांनी केवळ सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला. यावेळी उपमहापौर गुरुमित बग्गा, नगरसेवक शबाना पठाण, रशिदा शेख आदि उपस्थित होते. राष्ट्रवादीकडून सुनीता निमसे यांनी सभापतिपदाकरिता अर्ज दाखल केला. त्यांच्यासमवेत विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, राजेंद्र महाले उपस्थित होते.