कार्यवाही कुंभमेळ्यानंतर : पालकमंत्र्यांचा निर्वाळा
By Admin | Updated: July 12, 2015 00:14 IST2015-07-12T00:11:18+5:302015-07-12T00:14:38+5:30
महंत ग्यानदास यांच्या सूचनांना ‘खो’

कार्यवाही कुंभमेळ्यानंतर : पालकमंत्र्यांचा निर्वाळा
नाशिक : रामकुंडावर स्नानासाठी अडथळा ठरणारे वस्त्रांतरगृह पाडणे असो की, स्विमिंग पुलासारखा भासणाऱ्या रामकुंडाभोवतीचे सीमेंट क्रॉँकिट काढणे असो अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी केलेल्या सूचनांचे कोणतेही पालन सिंहस्थ कुंभमेळ्यात केले जाणार नसल्याचे शुक्रवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. आता जे काही होईल ते सारे सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर असे सांगून महाजन यांनी अप्रत्यक्ष साधू-महंतांनी यापूर्वी केलेल्या सूचनांना किंमत नसल्याचे दाखवून दिले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीची पाहणी व धर्मध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीच्या दृष्टीने बोलविलेल्या बैठकीसाठी शनिवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे नाशिकला आगमन झाले. दुपारी चार वाजता त्यांनी रामकुंड व परिसराला भेट देऊन तयारीची पाहणी केली व त्यानंतर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. रामकुंडावरील विविध मंदिरांना केली जात असलेली रंगरंगोटी योग्य पद्धतीने व त्यात रंगसंगती साधली जावी, अशी सूचना केली तसेच कपालेश्वर मंदिराच्या समोर असलेल्या जलकुंभावर पोलिसांनी दहशतवाद जनजागृतीबाबत लावलेला फलक तातडीने काढून टाकावे, असे आदेश दिले. अधिक मास व पुढे कुंभमेळा असल्याने रामकुंडावर भाविकांची कायमस्वरूपी गर्दी राहील ते पाहता रामकुंडात टाकले जाणारे पाने, फुले यांची त्वरित विल्हेवाट लावली जावी तसेच भाविकांसाठी पाणी वाहते कसे राहील याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे सांगितले. गोदाघाटावरील पुलांना वेगवेगळे रंग दिले जावे, जेणे करून त्याची त्वरित ओळख पटेल असे सांगून, गोदाकाठी शासकीय वा खासगी इमारतींना एकसारखा रंग देऊन त्याची शोभा वाढवावी त्याचप्रमाणे जाहिरात फलकांमध्येही साम्य असण्यासाठी काय करता येईल याचा अधिकाऱ्यांनी अभ्यास करावा, अशा सूचना केल्या.
तासभर चाललेल्या या पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी, सिंहस्थ कुंभमेळ्याची ९० टक्के कामे चांगल्या पद्धतीने पूर्ण झाल्याचे सांगितले. रामकुंडावरील वस्त्रांतरगृह पाडणे तसेच रामकुंडाला विळखा घातलेल्या सीमेंट क्रॉँक्रिट काढून रामकुंडाचे नैसर्गिक झरे मोकळे करण्याची साधू-महंतांनी केलेल्या सूचनांचे पालन करणे आता शक्य नसल्याचे सांगून, या संदर्भात आपली चर्चा झाली असून, कुंभमेळा पार पाडल्यानंतर त्याबाबतचा विचार करू असा निर्वाळा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)