Shiv Sena UBT: एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा अन्य क्षेत्राप्रमाणे राजकारणात वापर सुरू असून, गेल्या वर्षी दिवंगत करुणानिधी आणि जयललिता यांच्या नेत्यांच्या आवाजातील भाषणानंतर आता शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात सद्यःस्थितीवर त्यांचे भाषण सादर होणार आहे. यानिमित्ताने निष्ठावान शिवसैनिकांना साद घालण्याबरोबरच या पाखरांनो परत फिरा असे अन्यत्र गेलेल्या शिवसैनिकांना आवाहन करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
नाशिकमध्ये होणाऱ्या निर्धार मेळाव्यात शिवसेना प्रमुखांचे एआयमधील भाषण हे आकर्षण करणार आहे. यापूर्वी दूरदृश्यप्रणालीद्वारे सभा, उद्घाटने झाले आहेत. मात्र, एआयच्या माध्यमातून भाषणांचा दौरही सुरू झाला आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात डीएमकेने एका मेळाव्यात दिवंगत नेते करुणानिधी यांचे भाषण ऐकवले होते, तर एडीएमकेने दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आवाजाची ध्वनिफीत तयार केली होती, ती मतदारांपर्यंत पोहोचवली होती.
महाराष्ट्रात मात्र शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात भाषणाचा पहिलाच प्रयोग होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यात शिवसेनाप्रमुख नक्की काय बोलू शकतील याविषयी तर्क सुरू असून अनोख्या प्रयोगाबद्दल उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
कमळाबाई म्हणजे ढोंगउद्धवसेनेच्या वतीने बुधवारी होणाऱ्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाचे टीझर प्रसिद्ध झाले आहे. त्यात बाळासाहेबांच्या आवाजातच नाशिकच्या मेळाव्यासंदर्भात भाष्य केले आहे. अर्थातच भाजपवर टीका करताना कमळाबाई म्हणजे ढोंग, जेव्हा भाजपला देशात कोणी ओळखत नव्हते, त्यावेळी शिवसेनेने आधार दिला असे नमूद केले आहे.