तब्बल आठ महिन्यांनी प्रवीण गेडाम यांच्या रूपाने पूर्णवेळ आयुक्त
By Admin | Updated: November 11, 2014 00:56 IST2014-11-11T00:55:33+5:302014-11-11T00:56:03+5:30
तब्बल आठ महिन्यांनी प्रवीण गेडाम यांच्या रूपाने पूर्णवेळ आयुक्त

तब्बल आठ महिन्यांनी प्रवीण गेडाम यांच्या रूपाने पूर्णवेळ आयुक्त
नाशिक : महापालिकेला तब्बल आठ महिन्यांनी प्रवीण गेडाम यांच्या रूपाने पूर्णवेळ आयुक्त लाभले असून, त्यांनी सोमवारी सूत्रे स्वीकारली. त्यामुळे अखेरीस प्रतीक्षा संपली असून, आता तुंबलेली नागरी कामे मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, तर दुसरीकडे मनसे काय नवनिर्माण करणार याची उत्सुकता आहे.महापालिकेचे यापूर्वीचे आयुक्त संजय खंदारे यांच्या आचारसंहिता कालावधीतील वादग्रस्त निर्णयांमुळे १३ एप्रिल रोजी बदली झाली. त्यानंतर पालिकेला पूर्णवेळ आयुक्त शासन नियुक्त करीत नव्हते. त्यामुळे मनपाचे कामकाज ठप्प झाले होते. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आयुक्त मिळणार अशा चर्चा सुरू झाल्या; परंतु पुरुषोत्तम भापकर यांच्यासह ज्या अनेक अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी नेमणुकादेखील झाल्या; परंतु नाशिकला आयुक्त तर नाहीच परंतु एमएमआरडीएचे राजीव उन्हाळे यांची नियुक्ती झाल्याची चर्चा झाली आणि तीही हवेतच विरली.
पालिकेला पूर्णवेळ आयुक्त नाही आणि प्रभारी आयुक्त ठोस निर्णय घेत नाही त्यामुळे नगरसेवकांची अवस्था बिकट झाली होती. महापालिकेत सत्तारूढ असलेल्या मनसेने तर पूर्णवेळ आयुक्तांंची नियुक्ती नाही हा राजकीय मुद्दा बनविला. पूर्णवेळ आयुक्त नसल्याने नाशिकचे नवनिर्माण करता येत नाही, अशी कैफीयत राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान मांडली होती. त्यानंतर आता आयुक्त लाभल्याने कोणते नवनिर्माण होणार याविषयी नागरिकांना उत्सुकता आहे.