ड्रेनेजबळीनंतरही मनपा बेफिकीर

By Admin | Updated: September 11, 2015 23:49 IST2015-09-11T23:48:36+5:302015-09-11T23:49:31+5:30

सुरक्षा वाऱ्यावर : द्वारका परिसरात आला प्रकार निदर्शनास

After Drainage, Manpa Beefikir | ड्रेनेजबळीनंतरही मनपा बेफिकीर

ड्रेनेजबळीनंतरही मनपा बेफिकीर

नाशिक : गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत आनंदवल्ली आणि सातपूर औद्योगिक वसाहतीत ड्रेनेजच्या चेंबरमध्ये गुदमरून पाच जणांचे बळी गेल्याच्या दुघटनेनंतरही महापालिका प्रशासन सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेविषयी किती बेफिकीर आहे, याचे दर्शन शुक्रवारी द्वारकावर घडले. हॉटेल राधिकाजवळ चेंबरमध्ये उतरून कोणत्याही सुरक्षासाधनांशिवाय काम करणाऱ्या सफाई कामगाराचे छायाचित्रच पुराव्यादाखल माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांसमोर ठेवले आहे.
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये आनंदवल्ली येथील चेंबरमध्ये तिघांचे बळी गेले होते, तर गेल्या शनिवारी सातपूर औद्योगिक वसाहतीतील साईश इंजिनिअरिंग कंपनीत ड्रेनेजच्या चेंबरमध्ये महापालिकेच्या एका सफाई कर्मचाऱ्याबरोबरच खासगी कामगाराचा मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी झालेल्या महासभेत उमटले. यावेळी सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली होती. भारत सरकारच्या राजपत्रानुसार सफाई कर्मचाऱ्यांना चेंबरमध्ये उतरविण्यात येऊ नये, तसे केल्यास संबंधित दोषींना कारावास व दंडाची तरतूद असलेली शिक्षा असल्याचेही सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते. तीन तासांच्या चर्चेनंतर, महापौरांनी सफाई कर्मचाऱ्यांना चेंबरमध्ये उतरविण्यात येऊ नये आणि त्यांना सुरक्षा साधने पुरविण्याबाबत दक्षता घेण्याचे आदेश खातेप्रमुखांना दिले होते. महासभेने दिलेल्या आदेशाला दोन दिवस उलटत नाही तोच शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना द्वारकावरील हॉटेल राधिकाजवळ ड्रेनेजच्या चेंबरमध्ये एक कर्मचारी उतरून कोणत्याही सुरक्षासाधनांविना हाताने मैला काढत असल्याचे निदर्शनास आले. बडगुजर यांनी आपले वाहन थांबवून कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, सदर कर्मचाऱ्यांनी आमचे हे रोजचेच काम असल्याचे आणि कोणतेही साधने नसल्याचे सांगितले. नऊ महिन्यांत ड्रेनेजने पाच बळी घेऊनही आणि महासभेने सुरक्षाविषयक दिलेले आदेश ताजे अजूनही प्रशासन मात्र कर्मचाऱ्यांप्रती किती बेफिकीर आहे, याचाच प्रत्यय या प्रकारामुळे समोर आला आहे. (प्रतिनिधी)
दोनच दिवसांपूर्वी महासभेत प्रशासनाच्या कारभारावर सदस्यांनी हल्लाबोल केला होता. तरीही प्रशासन त्यापासून काही धडा घेऊ शकलेले नाही. शुक्रवारी मी द्वारकावरून जात असताना सदरचा प्रकार नजरेस आला. दुर्घटनेनंतरही महापालिका बेफिकीर आहे. सदर प्रकार आपण सफाई कर्मचारी आयोगाच्या निदर्शनास आणून देणार असून, तसे पुरावेही देणार आहोत. सफाई कर्मचाऱ्यांच्या जिवाशीच खेळण्याचा हा प्रकार आहे.
- सुधाकर बडगुजर, नगरसेवक

Web Title: After Drainage, Manpa Beefikir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.