कपातीनंतर पाणीप्रश्न होणार गंभीर
By Admin | Updated: October 6, 2015 23:07 IST2015-10-06T23:06:05+5:302015-10-06T23:07:59+5:30
वासननगर : परिसरातील रहिवाशांना चिंंता; तोडगा काढण्याची मागणी

कपातीनंतर पाणीप्रश्न होणार गंभीर
इंदिरानगर : वासननगर परिसरात सातत्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने संयम सुटलेल्या नागरिकांनी ठिय्या आंदोलन करून पालिकेचे लक्ष वेधून घेतले असले तरी आगामी पाणीकपातीच्या धोरणामुळे येथील पाणीप्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
वासननगर येथील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने येथील पाणीपुरवठा सुरळीत करावा यासाठी वारंवार पाठपुरावा केलेला आहे. कमी दाबाने आणि कमीवेळ पाणीपुरवठा होत असल्यामुळे येथील नागरिक सातत्याने पालिकेकडे पाणीपुरवठा पुरेशा दाबाने करावा यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र अद्यापही येथील पाणीप्रश्न सुटलेला नाही.
गेल्या सहा वर्षांपासून येथील परिसरात पहाटे दोन ते चार यावेळेत पाणीपुरवठा केला जातो. अवेळी होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कुटुंबातील महिलावर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. एकवेळ आणि तेही कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. याच कारणास्तव परिसरातील नागरिकांनी महिनाभरापूर्वी मुख्य रस्त्यावर अचानक रास्ता रोको आंदोलन केले होते. सुमारे तासभर ठिय्या आंदोलन केल्यानंतर पालिकेने सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. अजूनही वासननगर परिसरातील मुरलीधरनगर, गामणेमळा, माउलीनगर, पाणेरी सोसायटी, कैलास
रो-हाऊस आदि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. दरम्यान, याच काळात परिसरातील पाण्याचा व्हॉल्व्ह कुणीतरी बंद केल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून परिसराला पाणीपुरवठादेखील होऊ शकलेला नव्हता. त्यामुळे संतप्त नागरिकांना पुन्हा एकदा रास्ता रोको आंदोलन करावे लागले. आंदोलन करूनही पाणीपुरवठा विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले.
आता तर पालिकेने गुरुवारपासून पाणीकपातीची घोषणा केल्यामुळे परिसरात पाण्याची समस्या आणखी गंभीर बनणार आहे. पालिकेकडेच पुरेसे पाणी नसेल तर पाणी मिळणार कसे? असा प्रश्न निर्माण झाल्याने एकवेळ का होईना, परंतु पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी नागरिकांनी एकत्र येणे अपेक्षित आहे. (वार्ताहर)