अखेर बिबट्या जेरबंद
By Admin | Updated: October 6, 2015 22:30 IST2015-10-06T22:30:01+5:302015-10-06T22:30:45+5:30
सुटकेचा नि:श्वास : १५ दिवसांपासून मुखेड, सत्यगाव परिसरात होता वावर

अखेर बिबट्या जेरबंद
मुखेड : सत्यगाव, मुखेड परिसरात पंधरा दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अखेर जेरबंद झाला. मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सत्यगाव शिवारात पांडुरंग साबळे यांच्या मक्याच्या शेतात वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
दोन वर्षांपासून मुखेड परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे अनेक ग्रामस्थांनी ते पाहिले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण होते. वनखात्याचे कर्मचारी ठाकरे, सोनवणे, पगारे, जाधव आदिंनी समक्ष पाहणी केली असता, त्यांनाही बिबट्याच्या वावर असल्याचा माग आढळून आला. बिबट्याच्या पाऊलखुणा नजरेस पडल्या होत्या. पाच दिवसांपासून पांडुरंग साबळे यांच्या मक्याच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता. त्यामुळे ग्रामस्थ आश्वस्त झालेले असले तरी चतुर बिबट्या पिंजऱ्या जवळून जात असूनही पिंजऱ्यात सावज नसल्याने जेरंबद होत नव्हता. वन विभागाकडे पिंजऱ्यात सावज ठेवण्याची विनंती करण्यात आली. तेव्हा पिंजऱ्यात बकरी ठेवण्यात आली.
मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास डरकाळीचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक या ठिकाणी आले. बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाल्याचे दिसले. तरुणांनी पिंजऱ्याला कुलूप लाऊन पिंजऱ्याजवळ ठाण मांडले. वन विभागालाही कळविल्यानंतर वनक्षेत्रपाल ठाकरे व सहाणे या ठिकाणी दाखल झाले. वनाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला येवला येथील वन विभागाच्या कार्यक्षेत्रात हलविण्यात आले. या मोहिमेत ललित सांगळे, आनंदा सांगळे, विश्वासराव आहेर, सत्यगावचे सरपंच ईश्वर आव्हाड, वाल्मिक सांगळे, नवनाथ काळे, रावसाहेब आहेर, राजेंद्र रोकडे, पांडुरंग दराडे, मुखेड सरपंच संजय पगार, छगन आहेर, अनंता अहेर यांच्यासह ग्रामस्थ सहभागी होते.
बिबट्याने भरवस्तीतील अशोक सानप यांच्या गायीवर हल्ला करून तिला फस्त केले होते. काही वर्षांपासून परिसरात हरणांची संख्यादेखील शेकडोने वाढली असून, त्यामुळे शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त होत आहे. आता वनखात्याने परिसरातील हरणांचे, बिबट्या आदि वन्य प्राण्याच्या वावराबद्दल सजग अभ्यास करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची गरज असल्याचे मत परिसरातून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)