अखेर डिझेल इंजिन पॉइंट केले बंद

By Admin | Updated: May 5, 2016 00:48 IST2016-05-04T23:52:47+5:302016-05-05T00:48:14+5:30

दखल : बोअर विहिरींना डिझेलमिश्रित पाणी

After all, the diesel engine was stopped | अखेर डिझेल इंजिन पॉइंट केले बंद

अखेर डिझेल इंजिन पॉइंट केले बंद

देवळाली कॅम्प : मनमाड रेल्वेस्थानकातील समस्यांबाबत रेल्वेचे विभागीय सदस्य चावला यांनी तक्रार केल्यानंतर मनमाड रेल्वेस्थानकावरील डिझेल इंजिनमध्ये इंधन भरण्यासाठी असलेले सर्व सहा पॉइंट बंद करण्यात आले आहेत.
रेल्वेस्थानक परिसरातील विहिरी कूपनलिकांमध्ये डिझेलमिश्रित पाणी येत होते. वारंवार स्थानिक नागरिकांनी तक्रारी करूनसुद्धा रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नव्हती. खासदार हरिश्चंद्र चव्हाण व रेल्वेचे विभागीय सदस्य चावला यांनी मध्य रेल्वे अभियांत्रिकी विभागाचे सहायक प्रबंधक के. पी. मीना यांच्याकडे तक्रार केल्यानंतर महाप्रबंधक एस. के. सूद यांनी या डिझेल गळतीसह मनमाड रेल्वे स्थानकावरील गोंधळास जबाबदार असणारे स्टेशन मॅनेजर राठोड यांची निफाड येथे बदली केली असल्याचे समजते.
मनमाड हे मध्य रेल्वेचे मोठे जंक्शन असून देशभरात जाण्यासाठी येथून असंख्य रेल्वे गाड्यांसाठी थांबा आहे. हजारो प्रवाशांची गर्दी लक्षात घेता येथे सर्व सुविधा आवश्यक आहे. नुकतेच विभागीय सदस्य म्हणून रतन चावला यांची नेमणूक झाल्यानंतर खासदारांसह त्यांनी प्रत्येक रेल्वेस्थानक स्मार्ट व स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त, प्रवाशांच्या सुरक्षेने परिपूर्ण करण्यासाठी भेटी देण्याचा उपक्रम राबविला आहे.
मनमाड रेल्वेस्थानकावर कूपनलिकेत डिझेलमिश्रित पाण्याची तक्रार असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होऊनही उपयोगात येत नव्हते. डिझेल गळतीने एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात होती. या सर्व गंभीर प्रकारांची दखल रेल्वे विभागाच्या निदर्शनास आणून देत येथील इंधन भरण्यासाठी असलेले पॉइंट बंद करण्याबाबतची सूचना मांडली व रेल्वे प्रशासनाने ती तत्काळ मंजूरही केली. (वार्ताहर)

Web Title: After all, the diesel engine was stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.