४० दिवसांनंतरही नोटाबंदीची धग कायम
By Admin | Updated: December 22, 2016 00:26 IST2016-12-22T00:25:53+5:302016-12-22T00:26:08+5:30
४२ दिवस उलटले : ‘एटीएम’चा शोध अजूनही सुरूच

४० दिवसांनंतरही नोटाबंदीची धग कायम
नाशिक : नोटाबंदी होऊन ४२ दिवस झाले; मात्र अद्यापही शहरातील बाजारपेठांमध्ये नोटाबंदीची धग जाणवत आहे. ५० दिवसांमध्ये सर्व व्यवस्था सुरळीत होणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले असले तरी आता आठवडाभरात असा काय चमत्कार होणार ? असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. बाजारपेठांमध्ये व्यवहार करण्यासाठी नागरिकांना अजूनही विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. आॅनलाइन व्यवहार प्रणालीही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे गैरसोयीबरोबरच मनस्तापही सहन करावा लागत असल्याने ‘कॅश लेस’ व्यवहार करायचे तरी कसे असा सवाल संतप्त नागरिक करीत आहे.
महिना अन् वर्षअखेर
आठवडाभरानंतर डिसेंबरमहिन्याबरोबरच वर्षाचीही अखेर होणार आहे. यामुळे दैनंदिन व्यवहारांमध्ये अन्य महिनाअखेरच्या तुलनेत यावेळी जास्त वाढ होणार आहे. नागरिकांच्या खात्यात जमा होणाऱ्या पगाराची तसेच ज्येष्ठांच्या खात्यात जमा होणाऱ्या निवृत्तिवेतनाची रक्कम मिळविण्यासाठी पुन्हा तारेवरची कसरत करावी लागणार आहे. महिन्याच्या शेवटी नागरिकांना पैशाची अधिक गरज भासते. घरगुती व्यवहारांबरोबरच वैद्यकीय व्यवहारही महिनाअखेरीस वाढतात कारण महिनाअखेरनंतर नागरिकांच्या हातात पैसे येतात; मात्र सध्या नोटाबंदीमुळे नागरिकांना पैशांची चणचण भासत आहे. डिसेंबर महिन्याच्या एक तारखेला नागरिकांना हक्काचा पगार काढण्यासाठी बॅँका व एटीएमबाहेर तासन्तास उभे राहावे लागले होते.