२१ कोटींनंतर सहा कोटींची कामेही संशयाच्या भोवऱ्यात
By Admin | Updated: May 9, 2017 02:11 IST2017-05-09T02:11:09+5:302017-05-09T02:11:21+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेची दिंडोरी व नाशिक तालुक्यात ६ कोटींची रस्त्यांची कामे परस्पर मंजूर करण्यात आल्याचे आता उघड झाले आहे.

२१ कोटींनंतर सहा कोटींची कामेही संशयाच्या भोवऱ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा परिषदेला ३१ मार्च रोजी प्राप्त झालेल्या आदिवासी उपयोजनेतील २१ कोटींच्या रस्ते मंजुरीवरून वादळ उठलेले असतानाच आता दिंडोरी व नाशिक तालुक्यात अशाच पद्धतीने सुमारे ६ कोटींची रस्त्यांची कामे परस्पर मंजूर करण्यात आल्याचे आता उघड झाले आहे.
दरम्यान, नाशिक तालुक्यात चार कोटींची तर दिंडोरी तालुक्यात दोन कोटींची मंजूर करण्यात आलेली ३०५४ लेखाशीर्षाखालील ही रस्त्यांची कामे जिल्हा परिषदेच्या एका पदाधिकाऱ्याच्या संगनमताने मंजूर करण्यात आल्याची दबक्या आवाजात जिल्हा परिषदेत चर्चा आहे.
नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आदिवासी उपयोजनेतून ५०५४ लेखाशीर्षाखाली जिल्हा परिषदेला रस्ते व पुलांच्या कामांसाठी सुमारे १४ कोटी ३० लाखांचा निधी जिल्हा नियोजन मंडळाने उपलब्ध करून दिला होता. त्या निधीच्या दीडपट म्हणजेच २१ कोटींच्या रस्त्यांच्या कामांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंजुरी देण्यात आल्यावरून जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये नाराजी होती. त्यातूनच मग स्थायी समितीच्या बैठकीत भाजपा गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी या २१ कोटींच्या रस्ते मंजूर करण्याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित करून सर्वसाधारण सभेत याबाबत निर्णय झाल्यानंतरच संबंधित कामांना मंजुरी देण्यात यावी. तसेच मंजूर केलेल्या कामांची जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करावी, असाही ठराव संमत करण्यात आला होता. आता अशाच प्रकारे मागील दाराने जिल्हा परिषदेच्या नाशिक व दिंडोरी तालुक्यातील दोन गटात तब्बल ६ कोटींचा निधी जिल्हा नियोजन मंडळाने उपलब्ध करून दिल्याची चर्चा आहे. त्यात चार कोटींचा निधी नाशिक तालुक्यातील रस्त्यांसाठी तर दोन कोटींचा निधी दिंडोरी तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी मंजूर करण्यात आल्याचे समजते.