दहा तासानंतर झाली वाट मोकळी
By Admin | Updated: October 5, 2015 23:36 IST2015-10-05T23:32:54+5:302015-10-05T23:36:07+5:30
देवळाली कॅम्पची घटना

दहा तासानंतर झाली वाट मोकळी
देवळाली कॅम्प : देवळाली कॅन्टोमेंट बोर्ड हद्दीतील धोडींरोड मार्गावर असलेला शेकडो वर्ष जुना वटवृक्ष सोमवारी (दि.५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. हे झाड हटविताना दहा तास गेल्याने यामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
वडाचे झाड रस्त्यात आडवे पडल्यामुळे धोंडीरोड मार्ग पूर्णपणे बंद झाला. शिंगवे बहुला येथील नागरिक व कामगार तसेच शाळेतील विद्यार्थी यांचे यामुळे हाल झाले. वृक्ष पडल्यानंतर दहा तास उलटून गेले तरीदेखील कॅन्टोमेंट प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही.
नागरिकांनी यादरम्यान कार्यालयाचे उंबरे गाठून तक्रारी केल्या तरीदेखील हे वृक्ष जेथे पडले तो रस्ता कॅन्टोमेंट बोर्डाच्या हद्दीत नसून लष्कराच्या हद्दीत असल्याचे सांगून टाळाटाळ करण्यात आली. शिवसेनेचे प्रमोद मोजाड यांनी कार्यालय गाठून संबंधित अधिकारी यांना विनंती केली यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत चर्चा झाली नंतर तब्बल दहा तासानंतर रस्त्यावर पडलेला वृक्ष हटविण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, काही वाहनचालक बळजबरीने वडाच्या फांद्यांच्या खालून जाण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे कामात व्यत्यय निर्माण होत होता. (वार्ताहर)