हुंड्याचीही केली जाते जाहिरात?
By Admin | Updated: September 26, 2016 01:29 IST2016-09-26T01:28:38+5:302016-09-26T01:29:16+5:30
हुंडा प्रतिबंधक कायद्यालाच आव्हान : वधू-वर मेळाव्यांच्या नियतकालिकांवर संशय

हुंड्याचीही केली जाते जाहिरात?
संदीप भालेराव ल्ल नाशिक हुंडा देणे आणि घेणे कायद्याने गुन्हा ठरत असतानाही सदर प्रकार लग्नसोहळ्यात घडतच असल्याचे वास्तव लपून राहिलेले नाही. कायद्याच्या कसोटीवर तसे सिद्ध करणे शक्य नसल्याने ही अनैतिक प्रथा समाज, रुढी आणि प्रतिष्ठेच्या नावाखाली चारभिंतींच्या आत आजही सुरूच आहे. काल-परवापर्यंत आपसातील हा व्यवहार आता खुलेआम झाला असून, लग्नासाठी हुंड्याची जाहिरात केली जात असल्याचे समोर आले आहे. विशेषत: वधू-वर मेळाव्यांमध्ये असे प्रकार घडत असल्याचा संशय असल्याने अशा मेळाव्यांवर यापुढे शासनाकडून लक्ष केंद्रित केले जाणार आहे. हुंडा देणे-घेणे कायद्याने गुन्हा ठरत असतानाही या कायद्याला न जुमानता लग्न सोहळ्यात हुुंड्याचे प्रकार कमी झालेले नाहीत. हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार हुंडा देणारे, घेणारे आणि या प्रकाराला प्रोत्साहन देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. पाच वर्षांची कैद किंवा १५ हजारांचा दंड असे शिक्षेचे स्वरूप आहे. असे असतानाही हुंड्याबाबतची नागरिकांची मानसिकता बदललेली नाही. वधू-वर मेळाव्यांमध्ये असे प्रकार घडत असल्याचा शासनाचा संशय आहे. त्यामुळे अशा मेळाव्यांची माहिती शासनाकडून मिळविली जात आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक समाज आणि संस्थांकडून वधू-वर मेळाव्यांचे आयोजन केले जाते. मात्र यातील काही संस्थांना आता व्यावसायिकतेचे स्वरूप आले आहे. त्यामुळे संबंधित वधू-वर संस्था आकर्षक अशी पुस्तिका प्रसिद्ध करीत असतात. अशा नियतकालिकांमध्ये विवाहोत्सुक वधू-वरांची माहिती देताना काही नियतकालिकांमध्ये वराला वधूच्या घरच्यांकडून काय दिले जाऊ शकते किंवा व्यवसाय सांभाळणे तसेच व्यवसायात भागिदारी देण्याचेदेखील अप्रत्यक्षपणे नमूद केले जात असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. ही बाब मुलीच्या कुटुंबीयांकडूनच केली जाते असे नाही तर अनेक मुलांंचे कुटुंबीयदेखील हुंड्याची अप्रत्यक्ष मागणी मेळावा पुस्तिकेत नोंदवित असतात. मुलाचे शिक्षण भरपूर असतानाही त्याला किमान शिकलेली मुलगी अपेक्षित असते. त्यामागे हुंड्याचे गणित असल्याचे बोलले जाते. असे प्रकार वधू-वरांसाठी धोकेदायक हुंडाविरोधी कायदा असल्याने असे प्रकार घडत नसावेत, असे वाटते. आज-काल लोक जागरूक झाले आहेत. त्यामुळे असा धोका कुणीच पत्करत नाही. राज्यात कुठेतरी चुकून असे काही होऊ शकते. परंतु सर्रास असे प्रकार होत नाहीत. हुंड्याची जाहिरात केल्यास वधू-वरच अडचणीत येऊ शकतात. लग्न जुळण्याऐवजी तुटण्याचा धोकाच अधिक वाढेल. - एक संयोजक, वधू-वर मेळावा, नाशिक छुप्या पद्धतीने हुंड्याचीच मागणी काही वधू-वर सूचक नियतकालिकांमध्ये छापण्यात येणारी माहिती ही छुप्या पद्धतीने हुंड्याचे समर्थन करणारी असते. जसे वडिलांची प्रॉपर्टी दर्शविणे, व्यापार उद्योगाची माहिती देणे, त्यास सामावून घेण्याची तयारी दाखविणे अस्२ो प्रकार ऐकवित आहेत. आता तर मुली स्वत:च आपली अपेक्षा आणि हुंडा देण्यासाठीची तयारी अप्रत्यक्षपणे दर्शवितात. काही मंडळांमध्ये इंजिनिअर, अभियंता, सीए झालेल्या मुलांकडून केवळ ‘सुंदर मुलगी हवी’ अशी अपेक्षा छापली जाते. त्यात शिक्षणाची अपेक्षा नसणे हा हुंड्याचा छुपा प्रकारच आहे. कमी शिकलेल्या मुलींच्या कुटुंबीयांकडून बख्खळ हुंडा मिळतो, असा त्यामागचा व्यवहार मानला जातो. मात्र सर्वच मंडळे तसे करतात, असेही नाही. - वसंत रोहम, वधू-वर सूचक मंडळ यासंदर्भात काही वधू-वर मेळावा संचालकांकडे चौकशी केली असता हुंंडा उघडपणे मागितला जात नसल्याचे सांगण्यात आले. तसे प्रकार घडत नसल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला, मात्र काही घटकांकडून हुंडा पद्धतीविषयी कोणतीही तक्रार केली जात नाही, शिवाय तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न असल्याने वधू-वर मेळाव्याशी त्याचा संबंध जोडू नये, असेही त्यांनी सांगितले. मेळाव्याच्या ठिकाणी होणाऱ्या बैठकांमध्ये हुंड्याबाबतच्या चर्चा होत असल्याचाही संशय आहे. सर्वच वधू-वर मेळावे असे प्रकार करीत नसले तरी काही संस्थांकडून सदर प्रकार सुरू असल्याने शासनाने याकामी आता वधू-वर मेळाव्यांवर लक्ष केंद्रित केले असल्याचे समजते. हुंड्यासंदर्भातील कोणताही मजकूर छापणाऱ्यांवर प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालकल्याण विकास विभागाला दिले आहेत. निदर्शनास आल्यास कारवाई हुंडा प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत सातत्याने जनजागृती केली जाते. हुंडा प्रथेपासून परावृत्त करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला जातो. ही या कार्यालयाची नियमित बाब आहे. जर कुठे वधू-वर मेळाव्यांमध्ये हुंड्याविषयी जाहिरातबाजी केली जात असेल तर अशी बाब निदर्शनास आल्यास नक्कीच कारवाई केली जाईल. नागरिकांनीदेखील याबाबत जागरूक राहिले पाहिजे. - देवेंद्र राऊत, जिल्हा महिला व बालकल्याण विकास अधिकारी, नाशिक