येवल्यात बीएससी पावडरमध्ये भेसळ
By Admin | Updated: January 11, 2017 22:50 IST2017-01-11T22:49:55+5:302017-01-11T22:50:13+5:30
तक्रार : मुख्याधिकाऱ्यांना युवकांतर्फे निवेदन सादर

येवल्यात बीएससी पावडरमध्ये भेसळ
येवला : नगरपालिकेच्या वतीने डास निर्मूलनासाठी वापरण्यात येणाऱ्या बी.एस.सी. पावडरीत रांगोळीसदृश माती भेसळ असल्याची तक्रार काही युवकांनी केली असून, यासंबंधी पालिकेने चौकशी करून संबंधितांना जाब विचारावा आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करू नये, अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या नावे असणारे निवेदन उपमुख्याधिकारी एजाज शेख यांनी स्वीकारले. येवला शहरात अस्वच्छतेमुळे झालेल्या डासांचे निर्मूलन करण्यासाठी पालिका ठिकठिकाणी बी.एस.सी. पावडर टाकत आहे. सोमवारी येथील केशवराव पटेल मार्केटच्या मागील बाजूस असलेल्या महिला व पुरुष प्रसाधनगृहात स्वच्छतेसाठी बीएससी पावडर टाकण्यात आली. परंतु मोठ्या प्रमाणावर पावडर टाकूनदेखील वास का येत नाही म्हणून कुतूहलापोटी काही तरु णांनी संबधित पावडरचे निरीक्षण केले असता त्या पावडरचा वास येत नाहीच पण पावडरमध्ये रांगोळीसारखे काहीतरी भेसळ असल्याचे त्यांना आढळून आले. या युवकांनी पावडरचा नमुना घेतला व थेट पालिका कार्यालयात जाऊन ती पावडर पाण्यात टाकून प्रात्यक्षिक देखील दाखवले. पाण्यात टाकलेली पावडर थेट तळाशी गेल्याने पावडरमध्ये रांगोळी भेसळ असल्याचे प्रथमदर्शनी युवकांच्या नजरेस आले. त्यामुळे आरोग्य विभागातील शिल्लक असलेल्या बी.एस.सी. पावडरच्या नमुन्याची चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते अमोल गायकवाड, दीपक पाटोदकर, राहुल सुताने, दत्तात्रय कापसे, अनिल खरोटे, शंकर चासकर, विजय म्हस्के, राजेंद्र गांगुर्डे, संतोष गायकवाड यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)