संपकऱ्यांबाबत प्रशासन कठोर

By Admin | Updated: June 4, 2017 02:27 IST2017-06-04T02:27:42+5:302017-06-04T02:27:53+5:30

जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनी शेतकरी संपाचा काहीच परिणाम नसून, दूध व भाजीपाल्याची वाहतूक व्यवस्थित सुरू असल्याची माहिती दिली आहे.

Administration strict about contacts | संपकऱ्यांबाबत प्रशासन कठोर

संपकऱ्यांबाबत प्रशासन कठोर

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपाआड काही समाजकंटक या संपास हिंसक वळण देण्याच्या प्रयत्नात असल्याने अशा व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा देत, जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनी जिल्ह्यात शेतकरी संपाचा काहीच परिणाम नसून, दूध व भाजीपाल्याची वाहतूक व्यवस्थित सुरू असल्याची माहिती दिली आहे.
शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन करीत असलेल्या तयारीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी प्रसार माध्यमांना दिली, ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या नावाखाली काही समाजकंटक या संपास हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करीत असून, जर कायदा हातात घेण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, तसेच जिल्ह्यातून मालवाहतूक करण्यासाठी सुरक्षित ‘कॉरिडॉर’ तयार करण्यात आला आहे. दोन दिवसांत जिल्ह्यातून १९४ ट्रक पोलीस संरक्षणात विविध ठिकाणी रवाना करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
शेतकऱ्यांना त्यांचा माल बाजार समितीत विक्रीसाठी आणून, शेतमाल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आता रविवारीही बाजार समित्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत १९४ ट्रक भाजीपाला, दूध पोलीस संरक्षणात रवाना करण्यात आले असून, बाजार समित्यांचे पदाधिकारी, व्यापारी, मालवाहतूकदारांशी चर्चा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर पडून आहे. काही व्यापाऱ्यांनी कांदा निर्यातीची तयारी दर्शविली असल्याने त्यांच्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. शनिवारी शहरात दुधाचे ११ टॅँकर दाखल झाल्यामुळे शहरात दुधाचा तुटवडा नाही. ज्याही वाहतूकदारांना शेतमाल निर्यात करायचा असेल त्यांनी थेट निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याशी संपर्क साधावा, असे सांगून ज्यांना गरज असेल त्यांच्यासाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Administration strict about contacts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.