प्रशासनाकडून भाविकांना त्रास होऊ नये
By Admin | Updated: September 12, 2015 23:02 IST2015-09-12T22:58:11+5:302015-09-12T23:02:33+5:30
शंकराचार्य नरेंद्रानंद सरस्वतींची मागणी

प्रशासनाकडून भाविकांना त्रास होऊ नये
त्र्यंबकेश्वर : रविवारी होणाऱ्या दुसऱ्या शाहीस्नानाच्या पर्वणीला देशभरातून आस्था, विश्वास आणि श्रद्धा ठेवून येणाऱ्या भाविकांना प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, अशी मागणी सुमेरूपीठाचे शंकराचार्य नरेंद्रानंद सरस्वती यांनी केली आहे.
प्रशासनाकडून योग्य मार्गदर्शन व मदत मिळाली तरच भाविकांचा कुंभमेळ्यावरचा विश्वास दृढ होऊ शकेल. भाविकांनीही नियमांचे पालन करून, शिस्त पाळून कुंभनगरीचे पावित्र्य जपावे, असे आवाहन शंकराचार्यांनी केले आहे.
पहिल्या शाहीस्नानादरम्यान भाविकांना जसा त्रास झाला, तसा त्रास दुसऱ्या शाहीस्नानादरम्यान होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी.
देशभरातून भाविक कुंभमेळ्यासाठी, स्नान, दर्शन करण्यासाठी, साधुसंतांचे विचार ऐकण्यासाठी येत असतात. असे असताना स्थानिक पोलीस, इतर प्रशासनाकडून त्यांना त्रास झाला तर त्यांच्या मनात शंकेचे गोंधळाचे वातावरण तयार होते. ते होऊ नये यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच पर्यावरणासंदर्भात जगभर जी चिंता व्यक्त केली जात आहे तिला ‘खारूताईचा वाटा’ या न्यायाने कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाने एक तरी झाड लावावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)