प्रशासनाचे ‘फसवे’ नियोजन
By Admin | Updated: September 25, 2015 22:24 IST2015-09-25T22:23:59+5:302015-09-25T22:24:26+5:30
२४ किलोमीटरची भाविकांना पायपीट : आबालवृद्धांचा संताप अनावर

प्रशासनाचे ‘फसवे’ नियोजन
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रत्येक पर्वणीला कोटी भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून नियोजन करणाऱ्या पोलीस व जिल्हा प्रशासनाचे त्र्यंबकेश्वरच्या तिसऱ्या व अंंतिम पर्वणीचे नियोजन पूर्णत: फसले. बारा तासाहून अधिक काळ भाविकांना गैरसोयीच्या गर्तेत अडकवून ठेवण्याबरोबरच आबालवृद्धांना उन्हातान्हात तब्बल २४ किलोमीटरहून अधिक पायपीट करण्यास भाग पाडणाऱ्या प्रशासनाने गेल्या दोन पर्वण्यांकडे पाठ फिरविणाऱ्या व शेवटच्या पर्वणीला गर्दी करणाऱ्या भाविकांवर एक प्रकारे सूडच उगविला.
बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी व पाठोपाठ चौथा शनिवार, रविवार अशा सलग तीन दिवस सुट्ट्यांमध्येच त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याची तिसरी व अंतिम पर्वणी असल्यामुळे भाविकांनी गुरुवारी सायंकाळपासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत कुशावर्तात स्नानासाठी अनुमती देऊन भाविकांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न फोल ठरला, त्याचदरम्यान नाशिककडून त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांच्या गर्दीत वाढ होत असल्याचे पाहून प्रशासनाने रात्री दोन वाजेनंतर नाशिक-त्र्यंबक मार्गावरील खंबाळे येथील बाह्य वाहनतळावरून एसटी बस सोडण्यावरही निर्बंध लादले. रात्री खंबाळे बाह्य वाहनतळ गाठलेल्या भाविकांना रात्रभर गैरसोयीचा सामना करत मुक्काम करावा लागला तर त्यानंतरही सकाळ उजाडल्यावर एसटी बस कधी सुरू होतील याविषयी कोणतीही पूर्वसूचना एसटी वा जिल्हा प्रशासनाकडून दिली नसल्याने सकाळपासून भाविकांनी थेट रस्त्याचा ताबा घेत त्र्यंबकेश्वरकडे कूच केली. मुळातच त्र्यंबकेश्वरमध्ये आखाड्यांचे शाहीस्नान सुरू असताना त्यात बाहेरगावाहून निघालेल्या भाविकांची भर पडल्याने पुरता गोंधळ उडाला व खुद्द त्र्यंबकेश्वरमध्येच गल्लीबोळात बॅरिकेडिंग टाकून पोलिसांनी रस्त्यांची नाकाबंदी केली, त्यामुळे त्र्यंबकवासीयांनाही घराबाहेर पडणे मुश्कील झाले. दरम्यान, दुसरीकडे खंबाळे वाहनतळापासून पायपीट करत लाखोंच्या संख्येने निघालेल्या भाविकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. साधारणत: बारा किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी कोणतीही सुविधा रस्त्यावर करण्यात आलेली नव्हती. आबालवृद्ध, कडेवर तान्हुले घेऊन निघालेल्या भाविकांना पिण्याचे पाणीदेखील मिळाले नाही. उन्हाचा तडाखा सहन करीत निघालेल्या भाविकांनी वाटेत मिळेल तेथे आश्रय शोधण्याचाही प्रयत्न केला. (प्रतिनिधी)