खातेवाटपासाठी प्रशासनाची चतुराई
By Admin | Updated: October 23, 2014 00:06 IST2014-10-22T22:59:43+5:302014-10-23T00:06:04+5:30
कृषी व पशुसंवर्धन एकत्र ठेवण्याचा डाव

खातेवाटपासाठी प्रशासनाची चतुराई
नाशिक : बांधकाम व अर्थ ही मलईची खाती अमुक एका ठरावीक पदाधिकाऱ्याला मिळण्यासाठी प्रशासनातीलच काही झारीतील शुक्राचार्यांनी कृषी व पशुसंवर्धन ही दोन खाती अमुक एका नियमानुसार एकत्रच ठेवावी लागतील, असा शोध लावला आहे.
वास्तविक पाहता विदर्भात व मराठवाड्यात काही जिल्हा परिषदांमध्ये कृषी समितीला जोड अन्य वेगळ्या समित्यांची असल्याची चर्चा असून, पशुसंवर्धन समितीलाही वेगळ्याच समित्यांची जोड असल्याचे समजते; मात्र नाशिकला हाच फॉर्म्युला राबविला तर आर्थिक नाड्या असलेली अर्थ समिती आणि मलईचे खाते असलेली बांधकाम समिती एकाच सभापतीला देण्यासाठीच प्रशासनाने नियम शोधून काढल्याची जिल्हा परिषदेत चर्चा आहे. खातेवाटपात राष्ट्रवादीत व भाजपात धुसफूस होण्याची शक्यता असल्याने आणि त्याला कॉँग्रेस व शिवसेना हवा भरण्याची शक्यता पडताळूनच सत्ताधाऱ्यांमधूनच कोणीतरी प्रशासनाला कृषी व पशुसंवर्धन समिती एकत्र ठेवण्याबाबत खेळी करण्यास सांगितल्याची चर्चा आहे. कृषी समितीला बांधकाम समितीची जोड याच नाशिक जिल्हा परिषदेत मागील भूतकाळात देण्यात आल्याची उदाहरणे आहेत, तर आरोग्याला अर्थची जोडही देण्यात आल्याची चर्चा काही सदस्यांमध्ये आहे. त्यामुळेच येत्या ५ नोव्हेंबरची खातेवाटपासाठीची विशेष सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)