स्थायीच्याच अंदाजपत्रकावर प्रशासनाचा कारभार
By Admin | Updated: November 21, 2015 00:12 IST2015-11-21T00:12:29+5:302015-11-21T00:12:45+5:30
महापौरांकडून विलंब : कामे रखडल्याची प्रशासनाची कबुली

स्थायीच्याच अंदाजपत्रकावर प्रशासनाचा कारभार
नाशिक : विकासनिधीतून होणाऱ्या कामांना विलंब लागत असल्याने शुक्रवारी महापालिकेच्या महासभेत सदस्यांनी आयुक्तांना जाब विचारला तेव्हा महासभेने मंजूर केलेले अंदाजपत्रक अद्याप प्रशासनाला प्राप्तच झाले नसल्याचे धक्कादायक वास्तव आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सभागृहासमोर मांडले. महासभेने अंदाजपत्रक मंजूर करून ८७ दिवस उलटले तरी अंदाजपत्रक प्रशासनाला प्राप्त न झाल्याने अखेर आयुक्तांनी स्थायी समितीने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकावरच कारभार पुढे चालू ठेवण्याचे आदेश संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांना
दिले.
विकासनिधीवरून सदस्यांनी आयुक्तांना घेरले असतानाच डॉ. गेडाम यांनी निवेदन करताना अद्याप अंतिम अंदाजपत्रक प्राप्त झाले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. सदर अंदाजपत्रक प्राप्त झाल्यानंतर कोणत्या लेखाशीर्षाखाली कोणती कामे बसविता येतील, याचा विचार करता येईल, असेही स्पष्ट
केले. अद्याप महापौरांकडून महासभेचे अंदाजपत्रकच प्रशासनाला पाठविले गेले नसल्याबद्दल भाजपा गटनेते संभाजी मोरुस्कर यांनीही आश्चर्य व्यक्त केले आणि आता हे अंदाजपत्रक कधी पाठविले जाणार, त्यातील मंजूर कामे कधी मार्गी लागणार, पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकाची आता तयारी सुरू करायची वेळ असताना याच वर्षाचे अंदाजपत्रक अद्याप प्रशासनाला प्राप्त झाले नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली. अखेर आयुक्तांनी स्थायी समितीच्याच अंदाजपत्रकावर प्रशासनाचा कारभार चालू ठेवण्याचे आदेशित केले.
यावेळी महापौरांकडून काही खुलासा होईल, याची प्रतीक्षा सदस्यांनी होती परंतु महापौरांनीही स्थायीच्या अंदाजपत्रकाचा उल्लेख करत विषयाला बगल दिली.
त्यामुळे अंदाजपत्रक रखडविण्यात सत्ताधाऱ्यांना नेमके काय
स्वारस्य आहे, याची चर्चा
रंगली. (प्रतिनिधी)