आदिवासींमध्ये धनगर समाज नको
By Admin | Updated: August 14, 2016 22:59 IST2016-08-14T22:55:55+5:302016-08-14T22:59:15+5:30
हरिश्चंद्र चव्हाण : लोकसभेत निवेदन

आदिवासींमध्ये धनगर समाज नको
नाशिक : धनगर समाजाला आदिवासी जातीमध्ये समाविष्ट करून अनुसूचित जमातींतून आरक्षण देऊ नये. तसेच ९ आॅगस्ट हा दिवस विश्व आदिवासी दिन म्हणून साजरा केला जावा, अशी मागणी दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी लोकसभेत शून्य प्रहरात झालेल्या चर्चेदरम्यान केली.
आदिवासींच्या मानवी हक्कांचे संरक्षण व्हावे, त्यांना उदरनिर्वाहासाठी जल, जंगल आणि जमीन कायमस्वरूपी मिळावी. त्यांच्या संस्कृतीचे संरक्षण, अस्मिता, आत्मसन्मान मिळावा, यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने २३ डिसेंबर १९९४ रोजी आमसभेत ठराव संमत केला. त्यानंतर ९ आॅगस्ट हा दिवस ‘आदिवासी दिन’ म्हणून साजरा केला जात असला तरी, केंद्र सरकारने यापुढे हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून पाळला जावा. महाराष्ट्रात धनगर जातीचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण आदिवासींची व धनगरांची संस्कृती, अस्तित्व यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फरक आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करणे, हे संविधानाच्या विरोधात आहे. त्यांना आरक्षण द्यावे, परंतु अनुसूचित जमातीतून हे आरक्षण नसावे, त्यासाठी दुसरी सूची असावी, अशी मागणीही त्यांनी केली. (प्रतिनिधी)