आदिवासी तरुणांनी दाखविले प्रसंगावधान
By Admin | Updated: September 27, 2016 01:29 IST2016-09-27T01:28:34+5:302016-09-27T01:29:41+5:30
खोळंबा : पहाटे जोरदार पाऊस; वाघेरा घाटात कोसळल्या दरडी

आदिवासी तरुणांनी दाखविले प्रसंगावधान
नाशिक : रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या परतीच्या पावसाने धोंडेगावापासून तर हरसूलपर्यंत जोरदार हजेरी लावली. यामुळे नदी, नाले, ओहोळ पुन्हा खळाळून वाहू लागले होते. या सुमारास वाघेरा घाटात डोंगरावरील माती वाहून जात असल्याने तीन ठिकाणी दरडी कोसळल्याचे कळताच सकाळी १० वाजेच्या सुमारास काही आदिवासी तरुण प्रसंगावधान राखून घाटमार्गात दाखल झाले आणि रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षितरीत्या खुला करून दिला.
पावसामुळे वाघेरा घाटात नागमोडी वळणांवर दरड कोसळून रस्त्यावर दगड, माती पसरली होती. यामुळे वाहतुकीला खोळंबा झाला होता. नाकेपाडाच्या अलीकडे घाटात अखेरच्या वळणावर माती, चिखल झाल्याने वाहतूक काही वेळ थांबली होती. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप, सुटीमुळे निसर्गपर्यटनासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांची वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली होती.
यावेळी परिसरातील डोंगरमाथ्यावर जनावरे चारणाऱ्या आदिवासी तरुणांनी रस्त्यावरील माती, दगड बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. चिंचवड परिसरातील काही तरुणांनी रस्त्यावरचे खडी, झाडांच्या फांद्या उचलून फेकल्या. तरुणांनी रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र याबाबत अनभिज्ञच राहिला. (प्रतिनिधी)