आडगावला चिमुकलीवर तर शरणपुरोडला महिलेवर बलात्कार; एका संशयितास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:45 PM2021-03-21T16:45:50+5:302021-03-21T16:47:36+5:30
चिमुकलीला त्रास होऊ लागल्यानंतर तिने घडलेला प्रकार आपल्या नातेवाइकांना सांगितल्यानंतर पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत लोदवालविरुध्द फिर्याद दिली.
नाशिक : आडगाव पोलीस ठाणे हद्दीत एका चार वर्षीय चिमुरडीवर २८ वर्षीय युवकाने खाऊचे आमिष दाखवून शारीरिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पीडितेच्या आईने याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित भगतसिंग मोतीलाल लोदवाल (रा.नांदुरनाका) याच्याविरुध्द बलात्कार, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडीत चिमुकलीच्या घरी कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत संशयित लोदवाल याने मागील आठवड्यात फिर्यादीचे घर गाठले. त्याने चिमुकलीला खाऊ देण्याच्या बहाण्याने घराबाहेर नेऊन तिच्यावर अत्याचार करून नखांनी दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिमुकलीला त्रास होऊ लागल्यानंतर तिने घडलेला प्रकार आपल्या नातेवाइकांना सांगितल्यानंतर पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत लोदवालविरुध्द फिर्याद दिली. फिर्यादीनुसार पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून फरार संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा तपास महिला उपनिरीक्षक चांदणी पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
शरणपूर भागातील एका सार्वजनिक शौचालयात बळजबरीने घेऊन जात विवाहितेला त्याच्या पतीला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर शारीरिक अत्याचार करत शरीरसंबंध ठेवल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पीडित विवाहितेने स्वत: सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार कथन केला असता पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून संशयित पॉली शांतवन जाधव (३०, रा. कॅनडा कॉर्नर) यास अटक केली आहे.
एका सार्वजनिक शौचालयाशेजारील एका लहानशा खोलीत संशयित पॉली याने पीडित महिलेला १ जानेवारी २०१९पासून २० मार्च२०२१ या कालावधीदरम्यान, आत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयिताने विवाहितेला तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर पीडितेवर बळजबरीने वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. याप्रकरणी पॉली यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास महिला उपनिरीक्षक प्रियंका गायकवाड या करीत आहेत.