आडगाव,पिंपळगाव बहुला मोफत अंत्यविधीपासून वंचित
By Admin | Updated: August 27, 2015 00:08 IST2015-08-27T00:04:57+5:302015-08-27T00:08:50+5:30
आडगाव,पिंपळगाव बहुला मोफत अंत्यविधीपासून वंचित

आडगाव,पिंपळगाव बहुला मोफत अंत्यविधीपासून वंचित
नाशिक : गेल्या १३-१४ वर्षांपासून शहरात महापालिकेमार्फत सुरू करण्यात आलेली मोफत अंत्यसंस्कार योजना आडगावसह पिंपळगाव बहुला या पालिका हद्दीतील गावांमधील स्मशानभूमीमध्ये अद्यापही राबविली गेली नसल्याचे निदर्शनास आले असून, या ठिकाणी अंत्यविधीचे साहित्य पुरविण्यासाठी ठेकेदारच मिळत नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान, बुधवारी महासभेत नगरसेवक विक्रांत मते यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधल्यानंतर पालिकेने त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.
मंगळवारी झालेल्या महासभेत नगरसेवक विक्रांत मते यांनी आडगाव येथे स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी मोफत साहित्य न पुरवता मृताच्या नातेवाइकांकडून पैसे घेतले जात असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्याबाबतचा पुरावा म्हणून मते यांनी अंत्यविधीचे साहित्य खरेदी केल्याची पावतीच महापौरांसह आयुक्तांकडे सादर केली होती. याबाबत महापौर व आयुक्तांनी तत्काळ दखल घेत तक्रारीची तातडीने खात्री करून घेण्यासाठी महापालिकेचा कर्मचारी आडगाव येथे रवाना केला होता. मात्र, चौकशीअंती आडगाव येथील स्मशानभूमीत मोफत अंत्यविधी योजना राबविलीच जात नसल्याचे उघडकीस आले असून, याठिकाणी अंत्यविधीचे साहित्य पुरविण्यासाठी महापालिकेला ठेकेदाराच मिळत नसल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी तीन ते चार वेळा निविदाप्रक्रिया राबवूनही ठेकेदाराने प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, आडगावप्रमाणेच पिंपळगाव बहुला येथील स्मशानभूमीतही नागरिकांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे समोर आले. याठिकाणीही ठेकेदार उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात आले. ठेकेदाराअभावी दोन्ही स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार योजनेचा लाभ दिला जात नाही. मात्र, याठिकाणीही मोफत अंत्यविधी योजना राबविण्याबाबत प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.