दिंडोरी, पेठ तालुक्यांत अतिरिक्त भारनियमन
By Admin | Updated: May 29, 2014 16:30 IST2014-05-28T00:54:19+5:302014-05-29T16:30:14+5:30
वीज वितरण कंपनीने अतिरिक्त भारनियमन सुरू केल्याने जनतेचे हाल

दिंडोरी, पेठ तालुक्यांत अतिरिक्त भारनियमन
दिंडोरी : ऐन उन्हाळ््यात दिंडोरी व पेठ तालुक्यांत गेल्या आठ-दहा दिवसांपासून वीज वितरण कंपनीने अतिरिक्त भारनियमन सुरू केल्याने जनतेचे हाल होत असून, त्यातच सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. विजेचा बिघाड झाल्यास काही गावांना तर तीन-चार दिवस वीज गायब राहत असून, यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वीज वितरण कंपनीने त्वरित वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार धनराज महाले यांनी वीज वितरण कंपनीच्या मुख्य अभियंता अजनाळकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे. दिंडोरी व पेठ तालुक्यांतील वीजपुरवठा समस्या सोडविण्यासाठी आमदार धनराज महाले यांनी आज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता अजनाळकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करत निवेदन दिले. गेल्या आठ दिवसांपासून दिंडोरी, पेठ तालुक्यांत भारनियमनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, इतर वेळीही सातत्याने वीज खंडित होत आहे. यामुळे व्यावसायिकांच्या व्यवसायावर अनिष्ट परिणाम झाला असून, नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. अनेक गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेवर विजेचा परिणाम होऊन अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विजेच्या लपंडावात अनेक ठिकाणी विजेच्या संयंत्रात बिघाड होत असून, सदर बिघाड झाल्यानंतर वेळेवर दुरुस्ती होत नसल्याने अनेक गावे तीन-तीन चार-चार तास अंधारात राहत आहे. अनेक गावांमध्ये विद्युतपुरवठा करणार्या तारा जीर्ण झाल्या असून, अनेक ठिकाणी धोकादायक स्थितीत लोंबकळत आहे. रोहित्रांचीही दुरवस्था झाली आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही सदरची दुरुस्ती होत नाही तरी सदराची दुरुस्ती व्हावी तसेच भारनियमन कमी करून वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार धनराज महाले यांनी दिला आहे. निकवेल : बागलाण तालुक्यातील निकवेल येथे विजेचा लपंडाव सुरू झाल्याने शेतकरी हैराण झालेले आहेत. निकवेलसह परिसरातील गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ऐन कडकडीत उन्हाळ्यात भरदुपारी वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. परिणामी या भागातील ग्रामस्थांना वीजपुरवठा नसल्याने फॅन, कूलरची हवा मिळणेदेखील दुरापास्त झालेले आहे. अधिक उष्णतेने एककीडे ग्रामस्थ हैराण झालेले असताना दुसरीकडे वीज वितरण कंपनीच्या सावळ्या गोंधळामुळे अधिक भरडला जात आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांकडे विजेसंदर्भात माहिती विचारली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असतात. डांगसौंदाणे येथील कार्यालयात चौकशी केली असता सटाणा येथून थेट वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची कारणे दिली जातात. यामुळे सुरळीत होणे आमच्या हातात नसल्याने सांगून हात वर केले जातात. निकवेल येथे सिंंगल फेज योजना असतानादेखील विद्युतपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. यात तातडीने सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पंचायत समितीचे सदस्य भास्कर बच्छाव, भिका वाघ, संतोष जाधव, उपसरपंच दीपक वाघ, मुरलीधर वाघ आदिंनी इशारा दिला आहे. (वार्ताहर)