अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश दौलताबादकर यांचे निधन
By Admin | Updated: September 22, 2015 00:11 IST2015-09-22T00:11:20+5:302015-09-22T00:11:46+5:30
अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश दौलताबादकर यांचे निधन

अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश दौलताबादकर यांचे निधन
नाशिक : येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्यंकटेश अरविंदराव दौलताबादकर (४७, रा़हिमालय बंगला, गोल्फ क्लबजवळ, मूळ राहणार परभणी) यांचे सोमवारी (दि़२१) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले़ छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर कुटुंबीयांनी त्यांना प्रथम सुयश व नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ़ ठाकूर यांनी मयत घोषित केले़
मूळचे परभणी येथील दौलताबादकर यांनी विधी शाखेच्या पदवीनंतर सुमारे पंधरा वर्षे परभणी जिल्हा न्यायालयात फौजदारी खटले चालविले़ यानंतर थेट जिल्हा न्यायाधीशपदाची परीक्षा देऊन १२ आॅक्टोबर २०१० मध्ये जिल्हा न्यायाधीश म्हणून ते न्यायिक सेवेत आले़ १३ जून २०१३ रोजी मुंबईहून नाशिक जिल्हा न्यायालयात तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली़ त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, शुभम व वडील असा परिवार आहे़
दरम्यान रविवारी सायंकाळी त्यांच्यावर नाशिकच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले़ यावेळी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद कारंजकर, जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला फलके-जोशी, एस़आऱ कदम, राजेश पटारे यांच्यासह न्यायाधीश, ज्येष्ठ विधिज्ञ व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)