अपर जिल्हाधिकारी पवार निलंबित
By Admin | Updated: December 4, 2015 22:52 IST2015-12-04T22:51:34+5:302015-12-04T22:52:28+5:30
अपर जिल्हाधिकारी पवार निलंबित

अपर जिल्हाधिकारी पवार निलंबित
नाशिक : नवीन शर्तींच्या जमिनींच्या व्यवहारात कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देऊन ३५ लाखांची लाच मागितल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल झालेले मालेगावचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांना सेवेतून निलंबित करण्याची कारवाई राज्य शासनाने केली आहे.
आॅगस्ट महिन्यात ही घटना घडली होती. नांदगाव तालुक्यातील नवीन शर्तींच्या जमिनींच्या व्यवहारात अनियमितता झाल्याची बाब पुढे करून जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील मालकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची नोटीस अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांनी बजावली होती, मात्र ही कारवाई टाळण्यासाठी जमीनमालकांकडे ३५ लाख रुपयांच्या लाचेची मागणीही मध्यस्थांमार्फत करण्यात आल्याने त्या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे जमीनमालकांनी
तक्रार केली होती. त्याचा आधार घेत, पवार यांच्या लाचेच्या मागणीच्या संभाषणाचा पुरावा
धरून पोलिसांत गुन्हा दाखल करून पवार यांना अटक करण्यात आली होती.
दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली, त्यानंतर मात्र पवार यांनी जमीनमालकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी नांदगावच्या तत्कालीन तहसीलदार, पोलीस निरीक्षकांवर दबाव टाकला होता.
या साऱ्या प्रकरणाबाबत
राज्य सरकारला अहवाल
सादर करण्यात आल्यानंतर तीन महिन्यांनी सरकारने पवार
यांना निलंबित करण्याची कारवाई केली. ज्या दिवशी गुन्हा
दाखल होऊन पवार यांना अटक करण्यात आली तेव्हापासून हे निलंबन लागू करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)