पहिल्या सहा तासिकांमध्ये राबविला उपक्रम
By Admin | Updated: October 16, 2015 22:29 IST2015-10-16T22:23:31+5:302015-10-16T22:29:57+5:30
अब्दुल कलाम जयंती : शाळांमध्ये विविध उपक्रम

पहिल्या सहा तासिकांमध्ये राबविला उपक्रम
पहिल्या सहा तासिकांमध्ये राबविला उपक्रमनाशिक : शाळेचा वर्ग असूनही कोणाच्या हातात ‘पुलं’, कोणाकडे ‘दमां’ची पुस्तके... कोणी तर ‘मृत्युंजय’, ‘महानायक’सारख्या जाडजूड कादंबऱ्याच आणलेल्या... या सगळ्यांचे एकाग्रतेने वाचन चाललेले... शहरातल्या बहुतांश शाळांमध्ये आज हेच चित्र दिसत होते... निमित्त होते माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वाचन प्रेरणा दिनाचे...
काही महिन्यांपूर्वी दिवंगत झालेल्या डॉ. कलाम यांचा जन्मदिन शाळांमध्ये यंदाच्या वर्षीपासून ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याच्या सूचना शिक्षण खात्याकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज शहरातील शाळांमध्ये मान्यवर वक्त्यांना बोलावून विशेष व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच पहिल्या सहा तासिकांना वर्गा-वर्गांत अवांतर पुस्तकांचे सामूहिक तथा स्वतंत्र वाचन करण्यात आले.
शिक्षकांच्या वतीने आदल्या दिवशीच विद्यार्थ्यांना वाचनासाठी घरून पुस्तके आणण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच शाळांच्या ग्रंथालयांतूनही पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते पु. ल. देशपांडे, शिवाजी सावंत, विश्वास पाटील आदि प्रख्यात लेखकांची पुस्तके आणली होती. काहींनी डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र असलेल्या ‘अग्निपंख’मधील काही उतारे वर्गात वाचून दाखवले. दरम्यान, काही शाळांच्या आवारात छोट्या पुस्तिकांचे स्टॉल्सही लावण्यात आले होते. तेथे पुस्तके खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती.