जेलरोडला पूर्ववैमनस्यातून कार्यकर्त्याचा खून
By Admin | Updated: January 21, 2017 00:42 IST2017-01-21T00:42:23+5:302017-01-21T00:42:41+5:30
जेलरोडला पूर्ववैमनस्यातून कार्यकर्त्याचा खून

जेलरोडला पूर्ववैमनस्यातून कार्यकर्त्याचा खून
नाशिकरोड : जेलरोड त्रिवेणी पार्क येथे शुक्रवारी (दि़२०) रात्री मनसेतून शिवसेनेत दाखल झालेल्या सुरेंद्र ऊर्फ घाऱ्या शेजवळ या युवकाचा पूर्ववैमनस्यातून अज्ञात चार-पाच हल्लेखोरांनी तलवार व कोयत्याच्या साहाय्याने वार करून खून केला़ या घटनेमुळे परिसरात दहशत व तणावाचे वातावरण पसरले आहे़ जेलरोड कारागृहाजवळील कॅनॉलरोड भागात राहणारा सुरेंद्र ऊर्फ घाऱ्या शेजवळ (३६) याच्यावर नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यात खून, मारामाऱ्या आदि प्रकारचे गुन्हे दाखल आहेत़ २००७ मध्ये दिग्रसकर खूनप्रकरणी सुरेंद्र शेजवळवर खुनाचा गुन्हा दाखल होता़ गत महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्याने जुना प्रभाग ३५ व नवीन प्रभाग १८ मधून उमेदवारीही केली होती़ नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत सुरेंद्रची आई शांताबाई हिनेदेखील मनसेकडून उमेदवारी केली होती़ गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वीच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेजवळ याने शिवसेनेत प्रवेश केला होता़ शुक्रवारी दिवसभर शिवसेनेच्या इतर इच्छुक उमेदवारांनी नवीन प्रभाग १८ मध्ये नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रचार केला होता़ रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शेजवळ व त्यांचा मित्र विक्र म पोरजे हे दोघे अॅक्टिवा दुचाकी (एमएच १५, एफई ३२५२) वरून नगरसेवक अशोक सातभाई यांच्या कार्यालयाकडून जेलरोडमार्गे घरी जाण्यासाठी त्रिवेणी पार्ककडे वळाले़ यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात इस्टीम कारने त्यांच्या अॅक्टिवाला पाठीमागून धडक दिली़ शेजवळ व पोरजे हे दोघेही खाली पडल्यानंतर हल्लेखोर गाडीतून उतरले व शेजवळ पळून जात असताना हल्लेखोरांनी त्यास गाठून तलवार व कोयत्याच्या साहाय्याने त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे वार केल्याने तो जागीच ठार झाला़ यानंतर हल्लेखोर फरार झाला़ या हल्ल्याचे वृत्त परिसरात पसरताच घटनास्थळी मोठा तणाव पसरला होता़ पोलिसांनी शेजवळ यास बिटको हॉस्पिटल व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ यावेळी बिटको व जिल्हा रुग्णालयात मोठा जमाव जमला होता़ रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी माहिती व संशयितांचा शोध घेण्यासाठी तळ ठोकून होते़ (प्रतिनिधी)
खुनाच्या घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदना साठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला़ यावेळी नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती़ दरम्यान, जिल्हा रुग्णालयात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़