विनामास्क नागरिकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:41 IST2021-03-04T22:12:13+5:302021-03-05T00:41:50+5:30
त्र्यंबकेश्वर : सध्या कोविडचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व पोलिसांकडून विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.

विनामास्क नागरिकांवर कारवाई
त्र्यंबकेश्वर : सध्या कोविडचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व पोलिसांकडून विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्र्यंबक हे तीर्थक्षेत्र असल्याने शहरात दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांचे प्रमाण अधिक आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरुद्ध प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी शुभम गुप्ता व तहसीलदार दीपक गिरासे, मुख्याधिकारी संजय जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून व्यापक मोहीम कुशावर्तापासून सुरू करण्यात आली आहे.
कोविडने सर्वत्र पुन्हा उसळी मारली असल्याने दक्षतेचा उपाय म्हणून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. मास्क न वापरणाऱ्या सुशिक्षित नागरिकांकडून एक हजार रुपये, ग्रामीण भागातील अशिक्षित व गरीब ग्रामस्थांकडून दोनशे रुपये दंड म्हणून आकारणी केली जात आहे.
सध्या त्र्यंबकेश्वरला एकही कोविड केअर सेंटर नाही. अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वॅब घेतले जातात. मात्र, रुग्णांना जिल्हा रुग्णालयात व खासगी रुग्णालयात दाखल केले जात आहेत. खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांची माहिती शासकीय यंत्रणेकडे व लोकांनादेखील दिली जात नाही. जिल्ह्यात नाशिक, मालेगाव व सिन्नर, निफाड, देवळा आदी भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे. उर्वरित कमी रुग्णसंख्या असलेल्या भागात कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पोलीस व प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात येत आहे.
उर्मट तसेच साथीचे संसर्गजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अशा २६८ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ग्रामीण भागात आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी आदी ही मोहीम राबवित आहेत.